कोलंबो : प्रभारी कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रतिकूल स्थितीत संयम कायम राखताना अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार व दोन धावा वसूल करीत भारताला आयसीसी महिला विश्वकप पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ४९.४ षटकांत २४४ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना दीप्ती शर्मा (७१) आणि मोना मेश्राम (५९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केल्यानंतरही भारतीय संघ संघर्ष करीत होता. मिताली राज दुखापतग्रस्त असल्यामुळे या लढतीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीतने जबाबदारीपूर्ण खेळी केली आणि भारताची या स्पर्धेतील विजयी मोहीम कायम राखताना जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती आणि दोन विकेट शिल्लक होत्या. वेगवान गोलंदाज मार्सिया लेत्सोलोच्या या षटकात पहिल्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात पूनम यादव धावबाद झाली. हरमनप्रीतकडे स्ट्राईक होता, पण तिला त्यानंतरच्या तीन चेंडूंवर धाव घेता आली नाही. त्यामुळे भारतीय तंबूत चिंता निर्माण झाली. या अनुभवी अष्टपैलू खेळाडूने संयम कायम राखत लेत्सोलोच्या पाचव्या चेंडूवर डीप मिडविकेटवर षटकार खेचला. भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. हरमनप्रतीने फुलटॉस चेंडू लाँगआॅनच्या दिशेला खेळत वेगाने पळत दोन धावा वसूल केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताने ५० षटकांत ९ बाद २४५ धावा फटकावल्या. हरमनप्रीतने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. त्यात दोन चौकार व एका षटकाराचा समावेश होता. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघाच्या जवळजवळ सर्वंच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण एकाही महिला फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे मिगुएन ड्यू प्रीज (४०), सलामीवीर लिजेल ली (३७), कर्णधार डेन वान निकर्क (३७) व सून ल्युस (३५) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिरुष कामिनी (१०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर दीप्ती व मोना यांनी पुढील २५ षटके संयमी फलंदाजी करीत शतकी भागीदारी केली. या दोन्ही खेळाडू चार धावांच्या अंतरात तंबूत परतल्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला. दीप्तीने ८९ चेंडूंत ८ चौकार लगावले, तर मोनाने ८२ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकार लगावला. वेदा कृष्णमूर्तीने २७ चेंडूंमध्ये ३१ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था) धावफलकदक्षिण आफ्रिका : एल. ली झे. वर्मा गो. पांडे ३७, एल. व्होलव्हार्डट झे. व गो. पूनम यादव २१, एम. ड्यू. प्रीझ झे. यादव गो. बिश्त ४०, टी. चेट्टी धावबाद २२, सी. एल. ट्रायोन त्रि. गो. शर्मा २३, डी. व्हॅन निकेर्क झे. कौर गो. पांडे ३७, एम. काप झे. कृष्णमूर्ती गो. गायकवाड १४, एस. ल्युस धावबाद ३५, एस. इस्माईल त्रि. गो. गायकवाड ०५, ए. खाका त्रि. गो. गायकवाड ०१, एम. एम. लेत्सोलो नाबाद ०३. अवांतर : ६. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद २४४. गोलंदाजी : एस. पांडे ८-०-४१-२, बिष्ट ९.४-०-३९-१, आर. गायकवाड ९-०-५१-३, पूनम यादव १०-०-३७-१, डी. बी. शर्मा ९-०-४६-१, डी. पी. वैद्य ४-०-२८-०.भारत : मोना मेश्राम त्रि. गो. निकेर्क ५९, एमडीटी कामिनी झे. निकेर्क गो. काप १०, डी. बी. शर्मा झे. व्होलव्हार्डट गो. लेत्सोलो ७१, व्ही. कृष्णमूर्ती झे. चेट्टी गो. काप ३१, एच. कौर नाबाद ४१, एस. पांडे धावबाद १२, डी. पी. वैद्य त्रि. गो. खाका ००, एस. वर्मा त्रि. गो. इस्माईल ००, एकता बिष्ट त्रि. गो. खाका ०६, पूनम यादव धावबाद ०७, आर. एस. गायकवाड नाबाद ००. अवांतर : ८. एकूण : ५० षटकांत ९ बाद २४५. गोलंदाजी : इस्माईल १०-०-४३-१, एम. काप १०-०-३६-२, ए. खाका १०-१-५५-२, डी. निकेर्क १०-०-४६-१, एस. ल्यूस ४-०-२७-०, एम. लेत्सोलो ६-०-३५-१.
हरमनप्रीतची लढवय्या खेळी; रंगतदार लढतीत भारताची सरशी
By admin | Published: February 22, 2017 1:28 AM