ऑनलाइन लोकमतडर्बी, दि. 20 - जागतिक महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरनं आतापर्यंतची सर्वाधिक पाचवी मोठी धावसंख्या उभारली आहे. तर महिला वन-डेत दुसरी सर्वाधिक धावसंख्या भारतीय महिला खेळाडूच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क हिनं 1997मध्ये नाबाद 229 धावांची खेळी करत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर भारताची वेगवान फलंदाज दीप्ती शर्मा हिने 2017मध्ये 188 धावा करून महिला वनडे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतली आहे. तसेच श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू हिनेसुद्धा यंदाच्या वर्षात नाबाद 178 धावा करून स्वतःच्या नावे नवा रेकॉर्ड केला आहे. इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स हिने 1997 साली नाबाद 173 धावा झोडल्या होत्या. तर, आता भारताच्या हरमनप्रीत कौरनं नाबाद 171 धावांची आघाडी घेऊन पाचवं स्थान पटकावलं आहे.
हरमनप्रीतने सामन्यावर मजबूत पकड मिळवत ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची जबरदस्त धुलाई करताना 115 चेंडूंत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तडाखेबंद खेळी केली. भारताने निर्धारित 42 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 281 धावा केल्या आहेत.
हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत खेळण्याचा चांगला अनुभव असल्याने तिने या सामन्यात बेधडक खेळी केली. जून 2016 मध्ये हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियातील टी -20 स्पर्धा बीग बॅशमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत खेळणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती. त्यामुळेच तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेतला होता. विशेष म्हणजे ऑसी स्पिनर्सला तिने जम बसवू न देता तिच्या गोलंदाजीवर जबरदस्त फडकेबाजी केली होती.