vinesh phogat election result live : विनेश फोगाटने तिच्या विजयानंतर हरयाणात काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. माजी कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत आमदार होण्याचा मान पटकावला. विनेश फोगाटने राजकारणात प्रवेश करताच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. हरयाणा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसने विनेश फोगाटला जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विनेशचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून विनेशच्या विजयाची माहिती दिली. विजयी होताच विनेशसह तिच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना विनेश म्हणाली की, सगळ्यांनी आणखी काही वेळ प्रतीक्षा करायला हवी. काँग्रेसचे काही उमेदवार आघाडी घेत आहेत. सुरुवातीला मी देखील पिछाडीवर होते पण नंतर विजयी झाले. अजून काही सर्व स्पष्ट झाले नाही. नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल. जुलाना मतदारसंघातील ज्यांनी ज्यांनी मला मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. नेहमी संघर्षाच्या वाटेवरुन चालणाऱ्या प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हा विजय आहे. या देशाने मला दिलेले प्रेम याबद्दल मी ऋणी आहे. सध्या सर्व जागांचे निकाल स्पष्ट झालेले नसल्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. पण, काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल.
विनेश फोगाटला एकूण ६५,०८० मते मिळाली, तर भाजप उमेदवार योगेश कुमार यांना ५९,०६५ मतदान झाले. इंडियन नॅशनल लोक दलाचे सुरेंदर लाथेर १०,१५८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष बाब म्हणजे विनेशने आपल्या पहिल्याच निवडणुकीत ६,०१५ मतांनी विजय साकारला. दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला मोठा धक्का बसला होता. कुस्तीपटू विनेशने ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात भाग घेतला होता. तिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅमने वाढले अन् तिला अपात्र घोषित करण्यात आले.