नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सने रविवारी सलग ११ वा पराभव स्वीकारताना आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. संघाला जर नशिबाची साथ लाभली तर पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात यश येईल, अशी प्रतिक्रिया संघाचा स्टार फिरकीपटू इम्रान ताहिरने व्यक्त केली. डेअरडेव्हिल्सला गेल्या दोन्ही सामन्यांत अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूवर षटकाराची गरज होती, पण त्यांना केवळ चौकार ठोकता आला. आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर त्यांना चौकार रोखण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना तीन विकेट््सनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात चार बळी घेणारा ताहिर म्हणाला, ‘राजस्थानची ज्यावेळी ४ बाद ७८ अशी अवस्था होती, त्यावेळी आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण विजयाचे श्रेय राजस्थान संघाला मिळायलाच हवे. त्याच्या तळाच्या फळीत चांगले फलंदाज आहे. विजयासाठी नशिबाची साथ लाभणे आवश्यक असते. आम्हाला दोन्ही सामन्यांत अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला. आज जर अखेरच्या चेंडूवर केवळ एक धाव झाली असती तर मी वेगळ्या पद्धतीने बोललो असतो. आम्ही चांगला खेळ करीत आहोत, पण नशीब आमच्यावर रुसलेले आहे.’युवराजने जर धावचितची संधी गमावली नसती आणि मनोज तिवारीने दीपक हुड्डाचा झेल सोडला नसता तर निकाल कदाचित वेगळा लागला असता. आम्ही व्यावसायिक खेळाडू असून आमचा आत्मविश्वास अद्याप ढासळलेला नाही. पराभवाची मालिका खंडित करण्यात आम्हाला लवकरच यश मिळेल, अशी आशा आहे. हुड्डाने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला आणि सामन्याचे चित्र पालटले, असेही ताहिर म्हणाला.
नशिबाची साथ लाभली नाही : ताहिर
By admin | Published: April 13, 2015 3:38 AM