लंडन : दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमलाने नवा विक्रम रचताना भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आमलाने ७ हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वात कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला. आमलाने इंग्लंडविरुद्ध २३ वी वैयक्तिक धाव घेतल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठला. यासाठी त्याने केवळ १५० डाव खेळले हे विशेष. हीच कामगिरी कोहलीने १६१ डावांमध्ये केली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे, आमलाने याआधी कोहलीचा सर्वात जलद ६ हजार धावा उभारण्याचा विक्रमही मोडला होता. त्याचबरोबर सर्वात कमी डावांमध्ये २ हजार, ३ हजार, ४ हजार आणि ५ हजार धावा काढण्याचा विक्रमही आमलाच्याच नावावर आहे. सर्वात कमी ७ हजार धावा काढण्याच्या यादीमध्ये आमला व कोहलीनंतर एबी डीव्हिलियर्स (१६६), सौरभ गांगुली (१७४), ब्रायन लारा (१८३), डेस्मंड हेन्स (१८७), जॅक कॅलिस (१८८) आणि सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, धोनी (तिघेही १८९) यांचा क्रमांक आहे.
हाशिम आमलाने रचला नवा विक्रम
By admin | Published: May 30, 2017 1:04 AM