ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - तोकड्या कपड्यातल्या टिव्ही अँकरला मुलाखत देण्यास अत्यंत धार्मिक असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या हाशिम आमलाने नकार दिल्याचे वृत्त आहे. एबीपीलाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार सदर अँकर अंगप्रदर्शन करणा-या आखूड कपड्यात होती. आमलाने तिच्या कपड्यांवर आक्षोप घेतला व तिने कपडे बदलले तर मुलाखत देऊ असे सांगितले. आयोजकांनी ही अट मान्य केली आणि ती अँकर कपडे बदलून आली.
हाशिम आमलाचे पूर्वज गुजरातमधले होते. इस्लाम कट्टरपणे पाळणा-या आमलाची धार्मिकदृष्ट्या आग्रही मागणी याआधीही दिसून आली होती. अफ्रिकेच्या क्रिकेट टीमच्या जर्सीवर कॅसल या बीअर कंपनीचा लोगो असल्याने हा जर्सी घालण्यास आमलाने नकार दिला होता, आणि त्यापायी ५००डॉलर्सचा दंडही सोसायची तयारी दर्शवली होती.
२००६मध्ये हाशिम आमलाचा उल्लेख श्रीलंका व अफ्रिकेदरम्यानच्या लाइव्ह समालोचनात टेररिस्ट असा केल्यामुळे टेन स्पोर्ट्सने ऑस्ट्रेलियन समालोचक डीन जोन्सला निलंबित केले होते.