गोल्ड कोस्ट - भारताच्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर टाकली आहे. हीना सिद्धूने मंगळवारी झालेल्या महिला नेमबाजीच्या 25 मीटर प्रकारात सुवर्णपदकावर लक्ष्यवेध केला. या सुवर्णपदकासोबत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 11 वर पोहोचली आहे.आज झालेल्या नेमबाजीतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात हीना सिद्ध आणि अन्नू सिंह भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र अन्नू सिंहचे आव्हान फार काळ टिकले नाही. हीना सिद्धू सुद्धा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या फेऱ्यांमध्ये हीनाने आपली कामगिरी उंचावली. अखेरी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्या नेमबाजांना मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला रौप्य तर मलेशियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
रविवारी सकाळी झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्याच अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकरने अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली होती.