सामना पाहायला येणाऱ्या दुचाकीस्वार प्रेक्षकांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट व बॅगसह स्टेडियमच्या आत नेण्यास मज्जाव केल्याने हेल्मेटची सुरक्षा करताना अनेकांची तारांबळ उडाली. शेकडो हेल्मेटधारकांना जामठा स्टेडियमबाहेर असलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवर पैसे मोजून हेल्मेट ठेवावे लागले. स्टेडियमबाहेर सात स्टॉल्स सजले होते. त्यात अनेकांनी हेल्मेट व बॅग ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजले. यातील पाच स्टॉल्स जामठ्यातील रहिवाशांचे आणि दोन स्टॉल बुटीबोरी येथे राहणाऱ्या इसमाचे होते. त्यांनी हेल्मेट ठेवणाऱ्यांना नंबर असलेली चिठ्ठी दिली होती. सामना संपल्यानंतर अर्ध्या तासात परत या अशी तंबीही देत होते.पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता, एका पोलीस निरीक्षकाने सांगितले, की आम्ही या स्टॉलधारकांना हेल्मेट सांभाळण्याची अधिकृत परवानगी दिलेली नाही. ते पैसे घेत आहेत व ज्या क्रिकेट चाहत्यांना आपले हेल्मेट ठेवणे गरजेचे आहे ते स्त:च्या जबाबदारीवर हेल्मेट जमा करीत आहेत. सामना सुरू झाल्यानंतर हेल्मेट सांभाळणाऱ्या व्यक्तीने पोबारा केला तर त्याला शोधणे कठीणही जाऊ शकते. टी स्टॉलवरदेखील काहींनी हेल्मेट ठेवले आहे. पण हेल्मेट सांभाळणारे बेपत्ता झाले तर शोधायचे कसे, हा देखील शोधाचा विषय आहे. ‘सौदागर अॅन्ड कंपनी’ अशी चिठ्ठी देणाऱ्या एका स्टॉलवर परिसरातील अनेक चाहत्यांनी हेल्मेट ठेवले. पण सामना संपेपर्यंत हेल्मेट वाऱ्यावर सोडल्यासारखेच असल्याचे या हेल्मेटधारकांचे मत होते.अनेक दुचाकीस्वार डबलसीट आल्याने त्यांनी एक हेल्मेट गाडीच्या मागे लॉक करून ठेवल्याचे दिसत होते. काहींनी लॅपटॉप आणि इतर साहित्याची बॅगदेखील या स्टॉलवर ठेवणे पसंत केले. स्टॉलवर हेल्मेटची गॅरंटी आहे काय, असे एका युवतीला विचारताच ती म्हणाली, ‘‘सध्यातरी सामना पाहायचा असल्याने रिस्क घ्यावीच लागेल. क्रिकेट फर्स्ट... बाकी सब भगवान भरोसे’’, अशी या युवतीची प्रतिक्रिया होती.
पैसे मोजूनही हेल्मेटची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: March 16, 2016 8:39 AM