ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड केल्यानंतर क्रीडा वर्तुळात वाद उफाळला आहे.
सलमान खानच्या 'गुडविल अॅम्बेसेडर' च्या निवडीवर काही खेळाडूंनी आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. तर, त्याला समर्थन देण्यासाठी अनेक बॉलिवूडकरांनी पुढाकार घेतला आहे.
यात अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिने पाठिंबा दर्शविल्यानंतर अभिनेता मनोज वाजपेयी आणि जिम्मी शेरगिल यांनीही सलमानच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत.
रिओ ऑलिम्पिक 'गुडविल अॅम्बेसेडर' च्या निवडीवर सुरु असलेल्या वादावर ऐश्वर्याला प्रश्न विचारल्यानंतर तिने सांगितले की, जर कोणतीही व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करत असेल आणि कुणाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा असेल, मग ते खेळ, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचं स्वागतच करायला हवे.
दरम्यान, या वादावर सलमान खानने स्वत: कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.