ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - माझी आजी ९० वर्षांची आहे, आजही ती शेती करते आणि ज्यावेळी महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे त्यावेळी मीही काही ना काही मदत करायला हवी असं वाटतं, असे उद्गार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी काढले आहेत. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यापाठोपाठ आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. अजिंक्य रहाणेने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला असून अजिंक्यच्या या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनीही त्याचे आभार मानले आहे.
मी श्रीलंकेच्या दौ-यावर असताना महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या बातम्या वाचत होतो, बघत होतो त्याचवेळी या राज्याचा नागरिक म्हणून मी काहीतरी मदत करीन हा निर्णय घेतला आणि यापुढेही मी असंच वागण्याचा प्रयत्न करीन असे रहाणे म्हणाला.
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या कलाकारांनी मोहीम सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही दुष्काळग्रस्तांना कोट्यावधीची मदत करण्याची दिली आहे. पण अद्याप एकाही क्रिकेटपटूने दुष्काळग्रस्तांना मदत दिली नव्हती.
मैदानात शांत व संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणा-या अजिंक्य रहाणेने आता मैदानाबाहेरही नवा आदर्श निर्माण केला आहे. अजिंक्यने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. पाणीटंचाईची समस्या असलेल्या ग्रामीण भागात शेतीसाठी जलयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. अजिंक्यने दिलेल्या निधीचा वापर या योजनेसाठी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाय जमिनीवर ठेवा - युवकांना सल्ला
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजिंक्यने प्रचंड मेहनत घेण्याचा सल्ला युवा खेळाडुंना दिला असून यश असो वा परायजय डोक्यात हवा जाऊ देऊ नका, पाय जमिनीवर ठेवा असेही अजिंक्यने सांगितले आहे. प्रत्येक खेळाडुसाठी तुमची अॅटिड्युड किंवा प्रवृत्ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे रहाणेने सांगितले आहे. प्रचंड मेहनत करा, डोक्यात हवा जाऊ देऊ नका असा सल्ला देणा-या अजिंक्यने सामाजिक कृतज्ञतेचा संदेशही आपल्या कृतीतून दिला आहे.