रायपूर : दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ७४ धावांची खेळी करणारा सनरायझर्स हैदराबाद संघाचा फलंदाज मोइजेस हेन्रिक्सची प्रशिक्षक टॉम मुडी यांनी प्रशंसा केली. हेन्रिक्स अष्टपैलुत्व सिद्ध करण्यास सज्ज असल्याचे मुडी म्हणाले. हेन्रिक्सच्या ४६ चेंडूंतील ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स संघाने ४ बाद १६३ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघाचा डाव ४ बाद १५७ धावांत रोखला गेला.मुडी म्हणाले, ‘मोइजेस हेन्रिक्सने आक्रमक अर्धशतकी खेळी करीत सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले. तो फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करण्यास सक्षम आहे.’ संघाबाबत बोलताना मुडी म्हणाले, ‘सध्या आमचा संघ समतोल आहे. केन विलियम्सनसारख्या दर्जेदार फलंदाजाचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. संघाचा समतोल बघता त्याला संधी मिळणे कठीण भासते.’ मुडी यांनी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व कर्णधार डेव्हिड वॉर्नरची प्रशंसा केली. मुडी म्हणाले, ‘भुवनेश्वर अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करीत आहे. वॉर्नर योग्यवेळी अचूक निर्णय घेत असून दडपणाखाली त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे.’ (वृत्तसंस्था)
हेन्रिक्स अष्टपैलुत्व सिद्ध करण्यास उत्सुक : मुडी
By admin | Published: May 11, 2015 2:37 AM