Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेक पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. पण, जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष होण्याचा मान त्याने पटकावला. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदकावर नाव कोरले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर या कामगिरीसह जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक स्वतःकडे कायम राखले. सलग दोनवेळा भालाफेकीतील जागतिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅदलेचने ८८.०९ मीटरसह कांस्यपदक निश्चित केले.
नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला, तेच रोहित यादवने ७७.९६ मीटर भालाफेक केला. पण, अँडरसनने पहिल्याच प्रयत्नात ९०.२१ मीटर लांब भालाफेक करून नीरजसमोर तगडे आव्हान ठेवले. त्यापाठोपाठ वेबरने ८६.८६ मीटर व जाकुबने ८५.५२ मीटर लांब भालाफेक केली. नीरजचा दुसरा प्रयत्न हा ८२.३९ मीटर इतका राहिला. जाकुबने दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी सुधारताना ८७.२३ मीटर लांब भालाफेकला.. अँडरसनने पुन्हा ९०.४६ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकावरील पकड घट्ट केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर लांब भालाफेक करून पदक शर्यतीत स्वतःला कायम राखण्याचा प्रयत्न केला. जाकुबने सुधारणा करताना ८८.०९ लांब भालाफेक करून रौप्यपदकावर दावा सांगितला होता.
रोहितने तिसऱ्या प्रयत्नात ७८.७२ मीटर अशी कामगिरी सुधारली, परंतु तो टॉप ८मधून बाहेर फेकला गेला. त्याला १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या तीन प्रयत्नांत नीरजला उलटफेर करण्याची संधी होती आणि त्याने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. रौप्यपदकावर दावा सांगणाऱ्या जाकुबने ८३.४८ मीटर भालाफेक केली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला.
व्हा नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार...
- ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदक
- जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक
- आशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक
- राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक
- जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा २०१६ - सुवर्ण