नवी दिल्ली - भारताच्या हिमा दासने अॅथलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. हिमाच्या या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच अनेक दिग्गजांनी, कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तिच्या दमदार कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (13 जुलै) हिमाचं कौतुक केलं होतंच, पण आज त्यांनी हिमाच्या अंतिम फेरीतील विजयाचा एक व्हिडिओ ट्विट करून तिला पुन्हा शाबासकी दिली आहे. या व्हिडीओमध्ये विजयानंतर हिमा तिरंगा शोधत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा क्षण पाहून मोदीही भावूक झाले.
फुटबॉल विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा या हायव्होल्टेज स्पर्धा सुरू असतानाही 19 वर्षीय हिमा दासने संपूर्ण देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यामुळे तिला भारताची फ्लाईंग राणी म्हणून संबोधले जात आहे. भारताच्या हिमा दासने अॅथलेटीक्स स्पर्धेत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत हिमाने सुवर्णपदक पटकावले आहे.