भारताची आघाडीची धावपटू हिमा दास ( Hima Das) हीनं शुक्रवारी आसाम पोलिस दलात उपअधीक्षक ( Deputy Superintendent ) म्हणून शपथ घेतली. यावेळी गुवाहाटी राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या हिमा दासचा भारतीय क्रीडाविश्वातील प्रवास थक्क करणारा आहे. आसाममधील धिंग गावातील तिचा जन्म. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मल्यानं आर्थिक चणचणी ही तिनं बालपणापासूनच पाहिली. शाळेत असताना तिला फुटबॉलचं वेड होतं आणि ती मुलांसोबत फुटबॉलही खेळायची. पण, शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या गुरुजींनी तिला धावपटू होण्याचा सल्ला दिला आणि तिचं नशीबच बदललं.
२०१८मध्ये कनिष्ठ जागतिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून हिमा प्रसिद्धीझोतात आली. या स्पर्धेत ट्रॅक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिनं ५०.७९ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमही केला. ट्रॅकवरच नव्हे तर हिमानं कोरोना काळात सामाजिक भान राखत अनेकांना मदत केली. आसाममध्ये आलेल्या पुरात अनेकांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठीही हिमानं पुढाकार घेतला होता. दरम्यान, भारताची स्टार धावपटू हिमा दास ( Hima Das) ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिनं पहिल्याच स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्रा प्री २ च्या महिला गटात तिनं हे यश मिळवले. आसामच्या धावपटू हिमा दासनं २३.२१ सेकंदाची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती. हिमानं सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची २२.८० सेकंदाची पात्रता वेळ गाठता आली नाही. एप्रिल २०१९मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली.