नवी दिल्ली : मोहम्मद अनसने चेक प्रजासत्ताक येथील क्लादनो अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत आपल्या राष्ट्रीय विक्रमामध्ये सुधारणा करत सुवर्ण पटकावत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. दुसरीकडे, महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत हिमा दासने दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत तिसरे सुवर्णपदक पटकावले.२४ वर्षीय अनसने शनिवारी रात्री ४५.२१ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. तो पोलंडच्या रौप्यपदक विजेत्या ओमेलको रफालच्या (४६.१९) तुलनेत एका सेकंदाने पुढे राहिला. अनसने गेल्या वर्षी ४५.२४ सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्याने हा विक्रम मोडताना २७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होणाऱ्या दोहा विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.२०० मीटर शर्यतीत हिमाने २३.४३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २३.१० सेकंद अशी आहे. तिने ११ दिवसांत तिसरे सुवर्ण जिंकले. याआधी हिमाने २ जुलैला पोंजनान व ७ जुलैला कुंटो स्पर्धेत २०० सुवर्णपदक पटकावले होते.>भारताच्या विपिन कासना, अभिषेक सिंग आणि देवींदर सिंग कांग यांनी पुरुषांच्या भालाफेक फायनलमध्ये अनुक्रमे ८२.५१ मीटर, ७७.३२ मीटर आणि ७६.५८ मीटरचे अंतर गाठताना अव्वल तीन स्थान पटकावले. पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमवीर तेजिंदर पाल सिंग तूरने कांस्यपदक जिंकताना २०.३६ मीटर अंतर गाठले. त्याचा राष्ट्रीय विक्रम २०.७५ मीटरचा आहे.महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत व्ही.के. विस्मयाने ५२.५४ सेकंद वेळेसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. सरिताबेन गायकवाड ५३.३७ सेकंद वेळेसह तिसºया स्थानी राहिली. दरम्यान, किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय स्मृती स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले.राष्ट्रीय विक्रमवीर एम. श्रीशंकरने लांब उडीमध्ये ७.९७ मीटरचे अंतर गाठत विजय मिळवला. अर्चनाने १०० मीटरमध्ये (११.७४ सेकंद), हर्ष कुमारने ४०० मीटरमध्ये (४६.७६ सेकंद), लिली दासने १५०० मीटरमध्ये (४:१९.०५), भालफेकमध्ये साहिल सिलवालने (७८.५० मीटर) आणि महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाने (४५.८१ सेकंद) सुवर्णपदकाचा मान मिळवला. राहुल (१५०० मीटर, ३:५०.६९), जिस्ना मॅथ्यू (४०० मीटर, ५३.७६) आणि गजानंद मिस्त्री (४०० मीटर, ४७.२३) यांनी रौप्य, तर रोहित यादवने भालाफेकमध्ये (७३.३३ मीटर) कांस्यपदक पटकावले.
हिमा दासची ‘सुवर्ण’ धाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 4:20 AM