मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याला भारताची धावपटू हिमा दासच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. तिचा प्रवास हा आजच्या जनरेशनसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असे त्याला वाटते. म्हणूनच त्याने भविष्यात या रिअल लाईफ खिलाडीवर जीवनपट बनवायची इच्छा व्यक्त केली आहे. हिमाने भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तिच्या या सुवर्णपदकापर्यंतचा थक्क करणारा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. त्याला अक्षयचाही समावेश आहे.
हिमाने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही विक्रमी कामगिरी केली. शेतक-याच्या मुलीने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा व अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कोणत्या महिला खेळाडूवर जीवनपट बनवायला आवडेल या प्रश्नावर अक्षय म्हणाला, हिमा दासची संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिचा हा थक्क करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर आल्यास अनेकांना जगण्याची, लढण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे तिच्यावर जीवनपट बनवायला नक्की आवडेल.