कोल्हापूर : येथील पोलो मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात झारखंडचा ३-१ गोलने पराभव करीत हिमाचलच्या मुलींनी राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल चषकावर नाव कोरले. या सामन्यात हिमाचलकडून अंजू, किरण आणि मनिषा यांनी तर झारखंडचा एकमेव गोल कुवारी इदवार हिने नोंदवला. सामन्यात उभय संघाकडून संयमी सुरुवात झाली. मात्र पाच मिनिटानेच हिमाचल प्रदेशने आघाडी घेतली. अंजू हिने मध्यभागातून धावत येत चेंडूवर ताबा मिळवला आणि गोलरक्षकला चकवत चेंडू जाळ्यात टाकला. पुढच्या मिनिटाला निशानेही संधी साधली होती. मात्र तिचा फटका क्रॉस बारला लागून गेला. ९ व्या मिनिटाला झारखंडने बरोबरी साधली. कुवारी इंदवार हिने टॉप कॉर्नरकडून हा शानदार गोल नोंदवला. बरोबरीनंतर उभय संघात चुरस वाढली होती. ११ व्या मिनिटाला हिमाचलच्या किरणने चेंडूवर ताबा मिळवत शानदार गोल नोंदवला. त्यानतर झारखंडच्या सुमती कुमारी हिने संधी घालवली. सामन्यातील निर्णायक क्षण ३३ व्या मिनिटाला आला. या वेळी हिमाचलच्या मनिषाने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि तिचा सरळ फटका गोलजाळ्यात गेला. दुसºया सत्रात, झारखंडने पुनरागमनाचे प्रयत्न केले मात्र हिमाचलचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. उलट, हिमाचलला ५६ व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती. संध्याकडून आलेल्या पासवर निशाने गोलजाळ्याकडे फटका मारला होता, मात्र तेथे एकही खेळाडू नसल्याने त्यांची ही संधी हुकली.
हिमाचलच्या मुलींची धमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 8:12 PM