नवी दिल्ली : भारतीय नेमबाज हिना सिद्धू आणि अंजली भागवत यांना अपूर्ण दस्तावेजांसह नेमबाजी शस्त्रे बाळगल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या बँकॉक-मुंबई या विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. कोरियातील चांगवोन येथे काल झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात सहभागी होऊन अर्जुन पुरस्कारप्राप्त दोन्ही खेळाडू मायदेशी परतत होत्या. सर्व दस्तावेज असतानादेखील आम्हाला विमानात प्रवेश नाकारण्यात आला, असे हिनाने सांगितले. ती म्हणाली, ‘‘आम्ही अतिरिक्त दस्तावेज दाखविले. शिवाय, सर्व प्रकारचे शुल्कदेखील भरले. तरीही बँकॉक विमानतळावर जेट एअरवेजचे सुरक्षा व्यवस्थापक असलेले शैलेश गाला यांनी विमानात चढण्याची परवानगी नाकारली. ते अहंकाराने बोलत होते. आम्ही त्यांना डीजीसीएची परवानगी तसेच सीमाशुल्क विभागाचे क्लिअरन्स दाखविले; पण त्यांनी आम्हाला कुठलेही स्पष्टीकरण नको, असे सांगून बोलण्यास नकार दिला. मी लेखी देते असेही बोलले; पण त्यांनी आमचे काहीही ऐकले नाही.दोन्ही खेळाडूंना झालेल्या मनस्तापानंतर भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने या प्रकरणात हस्तक्षेप केला. नंतर या दोन्ही खेळाडू एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट मिळवून भारतात परतल्या. हिना म्हणाली, ‘‘या घटनेनंतर आम्ही बँकॉक विमानतळाबाहेर जात ‘आॅन अरायव्हल’ व्हिसा घेतला. आम्ही जेटला अतिरिक्त सामनाचे भाडे दिले आणि एअर इंडियालादेखील भाडे दिले. एकूण १,७०० युरो खर्च झाले. अखेर नवी दिल्लीमार्गे आम्ही मुंबई गाठली.’’ दोघीही रात्री १२.३० वाजता बँकॉकला पोहोचल्या होत्या; पण मायदेशी परतण्यासाठी त्यांना सकाळी ८ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याच दस्तावेजांच्या आधारे या दोन्ही खेळाडूंनी स्वत:ची शस्त्रे कोरियन एअरवेजद्वारे बुसानहून बँकॉकला आणली, हे विशेष. (वृत्तसंस्था)
हिना सिद्धू, अंजली भागवत यांना विमानात चढण्यापासून रोखले
By admin | Published: April 17, 2015 1:11 AM