नवी दिल्ली : भारताची अव्वल निशानेबाज हिना सिद्धू हिने आशियाई आॅलिम्पिक पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत लौकिकानुसार कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला. विशेष म्हणजे, या गोल्डन कामगिरीसह हिनाने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळविला आहे. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली हिना आतापर्यंतची नववी भारतीय निशानेबाज ठरली आहे. डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे झालेल्या या स्पर्धेत २६ वर्षीय हिनाने चांगली सुरुवात करताना एकूण ३८७ गुणांचा वेध घेतला. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर कब्जा करताना हिनाने दुसऱ्या व तिसऱ्या सिरीजमध्ये सलग ९६ गुणांची लक्षवेधी कमाई केली. अंतिम फेरीत हिनाने जबरदस्त वर्चस्व राखताना एकूण १९९.४ गुण मिळविले. तिने चिनी-तैपईच्या तिएन चियेला १.३ गुणांनी मागे टाकले. तिएनने दुसरे स्थान पटकावले, तर गिम यून मी हिला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, अर्जुन पुरस्कारप्राप्त हिनाचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने सप्टेंबर महिन्यात आशियाई एअरगन अजिंक्यपद आणि नोव्हेंबरमध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई निशानेबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला होता. कुवेत येथे अंतिम फेरीत हिनाने १९८.२ गुणांचा जबरदस्त वेध घेतला होता. (वृत्तसंस्था) हिनाच्या आधी भारताच्या एकूण तीन पिस्तुल निशानेबाजांनी आॅलिम्पिक प्रवेश मिळविला असून त्यांमध्ये जितू राय (१० मी. एअर पिस्तुल), गुरप्रीतसिंग (२५ मी. एअर पिस्तुल) आणि प्रकाश नंजप्पा (५० मी. एअर पिस्तुल) यांचा समावेश आहे.याव्यतिरिक्त आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्रा, आॅलिम्पिक कांस्यपदकविजेता गगन नारंग, चैनसिंग, अपूर्वी चंदिला आणि मैराज अहमद खान या निशानेबाजांनीही आपापल्या प्रकारांमध्ये आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे.
हिनाने मिळविला आॅलिम्पिक कोटा
By admin | Published: January 28, 2016 1:46 AM