समीर देशपांडेकोल्हापूर : स्वप्नील हा शांत, साधा, सरळसोट विचार करणारा मुलगा आहे. ‘हे असं झालं तर कसं’ असा विचार तो करत नाही. हाच त्याचा स्वभाव त्याला यशापर्यंत घेऊन गेला असं मतं गेली ११ वर्षे त्याच्या प्रशिक्षक असलेल्या मुंबईच्या दीपाली देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलं. देशपांडे या गेली ३७ वर्षे या क्रीडा प्रकाराशी निगडित आहेत.स्वप्नीलविषयी भरभरून बोलणाऱ्या देशपांडे यांनी त्याची यशकथाच यावेळी उलगडली. त्या म्हणाल्या, २०१२ च्या ज्युनिअर नॅशनल टीमची जबाबदारी माझ्याकडे होती. २०१३ ला ज्युनिअर शूटर म्हणून स्वप्नील आला. २०१३- १४ आणि १५ अशा तीन वर्षांमध्ये तो अनेक स्पर्धा जिंकला. ज्युनिअर असूनही सिनिअर इंटरनॅशनल तो जिंकला होता. ज्युनिअर इंटलनॅशनमध्ये तर त्याने तीन सुवर्ण, रौप्यपदकं मिळवली हाेती. २०२० च्या टोकिओ ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली नाही; पण आम्ही सहा शूटर्सना ऑलिम्पिकसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला.२०२२ च्या बाकू येथील वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाली नव्हती; परंतु या ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आपल्या गुणांवर परिणाम होण्याच्या भीतीने काही खेळाडूंनी माघार घेतली आणि स्वप्नीलने हीच संधी घेतली. तिथे त्याने सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्यपदक घेतले आणि कोट्यातून त्याचे ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित झाले. तेव्हा आमच्याकडे दोन वर्षे हातामध्ये होती. त्यामुळे आम्ही त्याच्या कच्च्या बाबींवर लक्ष केंद्रित केले.
तो ‘फिटेस्ट शूटर’मुळात तो नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून आल्यामुळे त्याला दिल्लीतील प्रशिक्षण जड गेलं नाही. तो फिटेस्ट शूटर होता. सकाळी साडेपाचला उठायचं. योगा, मग नाश्ता. ९ ते १२ प्रशिक्षण, जेवण, पुन्हा २:३० ते ४ प्रशिक्षण, ५ ते ६:३० फिजिकल ट्रेनिंग नंतर जेवण आणि झोप. त्यांना आम्ही गुंतवून ठेवत होतो आणि या दिनक्रमाची त्याला सवय असल्याने तो लगेचच समरस झाला.स्टँडिंग पोझिशनमध्ये सुधारणायाआधी दोन, तीन वेळा त्याच्या स्टँडिंग पोझिशनमुळे त्याचे गुण कमी झाले होते; परंतु आम्ही त्यावरच ‘फोकस’केला होता. अशावेळी मानसिक स्थितीही उत्तम असणे आवश्यक असते. यासाठी वैभव आगाशे त्याला सात, आठ महिने मार्गदर्शन करत होते. कालसुद्धा तो ज्या ठिकाणी खेळत होता त्या ठिकाणी एसी नव्हता. इतर खेळाडू घामाघूम झाले होते; पण हा शांत होता आणि शांत राहूनच त्याने पदक जिंकले.