सोल : भारतीय शटलर अजय जयरामला रविवारी कोरिया ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चीनच्या चेन लोंग याच्याकडून १४-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे जयराम इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर राहिला. अव्वल मानांकित लोंगने सलग दुसऱ्यांदा कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले.स्पर्धेत एकमेव भारतीय आव्हान पेलणाऱ्या जागतिक क्रमवारीतील ३२ व्या मानांकित जयरामला लोंग याने ३९ मिनिटांत पराभूत केले. जयरामने अंतिम फेरीत धडक मारली होती; परंतु विजेतेपदाच्या लढतीत तो त्याचा फॉर्म कायम ठेवू शकला नाही आणि लोंगने भारतीय खेळाडूचे आव्हान सहजपणे पेलले.पहिल्या गेमच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंदरम्यान जबरदस्त लढत झाली; परंतु अखेर अनुभव पणाला लावत लोंगने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. जयरामने ९-९ अशी बरोबरी करताना जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडूला कडवी झुंज दिली; परंतु त्यानंतर चेन लोंगने त्याची आघाडी आणखी वाढवताना पहिला गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्येदेखील लोंग याने भारतीय खेळाडूवर वर्चस्व राखले. या गेममध्ये ४-४ अशा बरोबरीनंतर लोंगने ११-६, १५-८ आणि १९-९ अशी आघाडी मिळवल्यानंतर दुसरा गेम २१-१३ असा जिंकताना दुसऱ्यांदा कोरियन ओपनचे विजेतेपद जिंकले.प्रथमच एखाद्या सुपर सीरिज टुर्नांमेटच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या जयरामसाठी फायनलमध्ये पोहोचणे आणि नंबर वन खेळाडूसोबत विजेतेपदाची लढत खेळणे ही मोठी उपलब्धी ठरली. जयरामने याआधी डच ओपनचे विजेतेपद पटकावले होते.या स्पर्धेत जयरामने एकट्याच्या बळावर भारताचे आव्हान फायनलपर्यंत कायम ठेवले. स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूसह अन्य भारतीय खेळाडू दुसऱ्या फेरीतच गारद झाले. चौथा मानांकित किदांबी श्रीकांत आणि आठवा मानांकित पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते.महिला गटात सहाव्या मानांकित कोरियाची सुंग जी हिने चौथ्या मानांकित चीनच्या वांग यिहान हिचा एक तास १८ मिनिटांच्या अंतिम फेरीत २१-१४, १७-२१ असा विजय मिळवित विजेतेपद पटकावले. स्पर्धेत चीनने मिश्र दुहेरीचे, तर कोरियाने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. इंडोनेशियाने महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. (वृत्तसंस्था)
ऐतिहासिक क्षण हुकला
By admin | Published: September 21, 2015 12:05 AM