रिओ : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चमकदार कामगिरी केली खरी, पण अखेर इतिहास नोंदवण्यात अपयशी ठरली. रिओ आॅलिम्पिकमध्ये जिम्नास्टिकच्या वॉल्ट स्पर्धेत रविवारी तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या निकालानंतरही दीपाने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांत नोंदवले. दीपा आॅलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. तिने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावित आतापर्यंत निराश असलेल्या भारतीय पथकातील खेळाडूंना मान उंचावण्याची संधी दिली. त्रिपुराच्या दीपाने १५.०६६ चा सरासरी स्कोअर नोंदवित चौथे स्थान पटकावले. अमेरिकेच्या सिमोन बाईल्सने १५.९६६ च्या सरासरी स्कोअरसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर रशियाच्या मारिया पासेकाने (१५.२५३) रौप्य आणि स्वित्झर्लंडच्या ग्युलिया स्टेनग्रबरने (१५.२१६) कांस्यपदक पटकावले.
दीपा कर्माकरची ऐतिहासिक कामगिरी
By admin | Published: August 15, 2016 5:34 AM