रिओ दि जानेरियो : युवा मनू भाकर व सौरभ चौधरी यांनी शानदार पुनरागमन करताना १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्यामुळे भारताने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी (रायफल/पिस्तूल) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्याच अभिषेक वर्मा व यशस्विनी देसवाल यांनी रौप्यपदक पटकावले. अखेरच्या दिवशी भारताने जास्तीत जास्त संभाव्य पदकांवर नाव कोरले.
भारत यंदा आयएसएसएफ विश्वचषकमध्ये सर्व चारही टप्प्यात अव्वल स्थानी राहिला. त्यात ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे. भारताने एकूण नऊपैकी पाच सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदके पटकावली. अन्य कुठल्या देशाने येथे एकापेक्षा अधिक सुवर्णपदके पटकावली नाहीत, हे विशेष.
महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज अपूर्वी चंदेला व दीपक कुमार यांनी मिश्र एअर रायफल स्पर्धेत चौथे सुवर्णपदक पटकावले. अंजुम मुदगिल व दिव्यांश सिंग पवार यांनी कांस्यपदकाचा मान मिळवला. एअर पिस्तूलमध्ये मनू भाकर व सौरभ चौधरी यांनी यशस्विनी व वर्मा यांचा १७.१५ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षीय मनू व सौरभ विश्वचषक स्पर्धांच्या चारही टप्प्यांमध्ये आयएसएसएस मिश्र सांघिक एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली. त्यात अखेरच्या १० शॉटमधील १०० गुणांचा समावेश आहे. यशस्विनी व अभिषेक यांचा स्कोअर ३८६ असा होता. चीन कांस्य पदकाचा मानकरी ठरला. त्याआधी, अपूर्वी व दीपक यांनी एकतर्फी अंतिम लढतीत चीनच्या यांगा कियान व यू हाओनान यांचा १६-६ ने पराभव केला. दोघांनी दुसºया पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी ४१९.१ चा स्कोअर केला. त्यामुळे त्यांना थेट सुवर्ण पदकाच्या लढतीत स्थान मिळाले. अंजुम व दिव्यांश ४१८.० च्या स्कोअरसह चौथ्या स्थानी होते. कांस्य पदकाच्या लढतीत त्यांनी हंगेरीच्या एस्टर मेसजारोस व पीटर सिटी यांचा १६-१० ने पराभव केला.
भारताने यंदा आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या चार टप्प्यात २२ पदकांची कमाई केली. त्यात १६ सुवर्णपदकांचा समावेश अहे. यापूर्वी भारताने एकूण १९ सुवर्णपदके पटकावली होती; त्यात ११ सुवर्णपदके रायफल इव्हेंटमध्ये होती.