Asian Games 2023 Volleyball : भारताच्या पुरुष व्हॉलिबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी इतिहास रचला. समोर एकापेक्षा एक तगडे स्पर्धक असल्याने भारतीय संघाचा निभाव लागणे अवघडच आहे, असा अनेकांचा समज काल मिटला. भारतीय पुरुष संघाने काल २०१८च्या आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजयाची नोंद केली. २ तास ३८ मिनिटं चाललेल्या या सामन्यात भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर होता, परंतु त्यांनी अविश्वसनीय पुनरागमन केले आणि ३-२ असा विजय मिळवला.
दक्षिण कोरियाने तीन वेळा आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे आणि चारवेला ते आशियाई चॅम्पियन्स ठरले आहेत. भारताने त्यांच्या गटात २ पैकी २ सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे आणि ते पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक क्रमवारीबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ ७३व्या आणि दक्षिण कोरिया २३ व्या स्थानावर आहे. मागील १० वर्षांतील भारतीय संघाचा दक्षिण कोरियावरील हा पहिलाच विजय आहे. भारताने १९८६ नंतर या स्पर्धेत पदक जिंकलेले नाही. १९८६ मध्ये भारताला कांस्यपदक जिंकता आले होते.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अश्वल रायने सांगितले की, "सामना इकडे तिकडे स्विंग होत होता. आम्ही तिथे हँग आउट करून खेळाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा विजय आहे. कारण बरेच लोक हे पाहत आहेत आणि आम्हाला अव्वल १२च्या फेरीत चांगली कामगिरी करायची आहे."