ख्राईस्टचर्च : गोलंदाजांनी अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्यात यश मिळवले, पण पॅटिन्सनच्या भेदक माऱ्यापुढे यजमान न्यूझीलंडची दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १२१ अशी अवस्था झाली आहे. न्यूझीलंडला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १४ धावांची गरज असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने वर्चस्व कायम राखले आहे. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी केन विलियम्सन (४५) व कोरी अॅन्डरसन (९) खेळपट्टीवर होते. कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलम अखेरच्या डावात २५ धावा काढून बाद झाला. पहिल्या डावात त्याने सर्वांत वेगवान शतक करण्याचा विक्रम नोंदवला आहे. मॅक्युलमने २७ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व १ षटकार ठोकला. त्याला जोश हेजलवुडने माघारी परतवले. कसोटी क्रिकेटमधील मॅक्युलमची ही अखेरची खेळी होती. मॅक्युलम मैदानातून परतताना भावूक झाला होता. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथने त्याच्यासोबत हस्तांदोलन करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने ३९ धावा फटकावल्या, पण मार्टिन गुप्तील (०) झटपट माघारी परतला. विलियम्सनने (नाबाद ४५) लॅथमसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मॅक्युलम व विलियम्सन यांनी चौथ्या विकेटसाठी ३३ धावा जोडल्या. आॅस्ट्रेलियातर्फे पॅटिन्सनने अचूक मारा करताना २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याआधी, कालच्या ४ बाद ३६३ धावसंख्येवरून पुढे खेळताना अॅडम व्होग्स व नॅथन लियोन यांनी पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. व्होग्सने ६० तर लियोनने ३३ धावांचे योगदान दिले. मिशेल मार्शने १८ तर पीटर नेव्हिल व हेजलवुड यांनी प्रत्येकी १३ धावा फटकावल्या. तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाने उर्वरित सहा विकेट केवळ ६७ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. (वृत्तसंस्था)
पॅटिन्सनचा अचूक मारा
By admin | Published: February 23, 2016 3:13 AM