होबार्ट : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने बाळाला जन्म दिल्यानंतर कोर्टवर शानदार पुनरागमन केले. गुरुवारी सानियाने यूक्रेनची नादिया किचेनोक हिच्यासोबत खेळताना होबार्ट आंतरराष्टÑीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरीगाठली.
किचेनोक-सानिया यांनी अमेरिकेची जोडी वानिया किंग- ख्रिस्टीना मौकहेल यांच्यावर एक तास २४ मिनिटांत ६-२,४-६, १०-४ अशा फरकाने मात कोली. पाचवी मानांकित सानिया-किचनोक या जोडीने टायब्रेकरमध्ये शानदार कामगिरी केली. आता या जोडीची गाठ स्लोवेनियाची जमारा जिंदासेक आणि झेक प्रजासत्ताकची मारी बुजकोवा यांच्याविरुद्ध पडेल. या जोडीने कॅनडाची शेरोन फिंचमन आणि यूक्रेनची कॅटरिना बोंडारेस्को यांचा ६-३, ३-६, १०-४ अशा फरकाने पराभव केला.
सानिया- किचनोक यांनी जोरदार सुरुवात करीत प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस दोनदा ब्रेक केली. सेटमध्ये चारवेळा ब्रेक पॉर्इंटही टाळले. दुसरा सेट आठ गेमपर्यत लांबल्यामुळे सानिया- किचनोक यांनी सर्व्हिस मोडित काढून टायब्रेकरमध्ये बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये सानिया- किचनोक यांनी एकतर्फी वर्चस्व गाजविले. 2018साली बाळाला जन्म दिल्यापासून सानिया दोन वर्षे टेनिसपासून दूर होती. त्याआधी आॅक्टोबर २०१७ ला ती अखेरचा सामना खेळली होती. एकेकाळी जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानियाने कारकिर्दीत सहा वेळा ग्रँडस्लॅम जिंकले आहे. २०१३ ला तिने एकेरीत खेळणे सोडून दिले. २००७ साली डब्ल्यूटीए एकेरीत सानिया २७ व्या स्थानावर दाखल झाली होती. कारकिर्दिमध्ये सानियाला सतत मनगट आणि गुडघ्याच्या दुखापतीने त्रास दिला.