सिडनी : पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत. यावर तोडगा म्हणून विराट कोहली याला तिरंगी मालिकेत चौथ्या स्थानावर पाठवून फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे ‘टीम इंडिया’चे प्रयत्न राहतील. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला इंग्लंडकडून मंगळवारी नऊ गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे भारत ‘करा किंवा मरा’ अशा अवस्थेत पोहोचला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट येथे पुढचा सामना खेळण्याआधी धोनीची चिंता वाढली. विराटला चौथ्या स्थानावर पाठविण्याचा आपला निर्णय किती योग्य होता, हे सांगायला पराभवानंतरही धोनी विसरला नाही. तो म्हणाला, ‘आम्ही मधली आणि तळाची फळी अधिक सक्षम बनवू इच्छीतो. रवींद्र जडेजा संघात नाही. शिवाय, स्टुअर्ट बिन्नी खेळला असता, तर विराटला तिसऱ्या स्थानावर पाठवू शकलो असतो. अक्षर पटेल किंवा अश्विन अंतिम एकादशमध्ये असते, तरी सुरेश रैना याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर पाठविता आले असते. त्यानंतर फलंदाजी शिल्लक राहात नाही. विराट चौथ्या स्थानावर खेळायला आला आणि गडी लवकर बाद झाले, तर विराटला १२ किंवा १३ व्या षटकात खेळपट्टीवर येण्याची संधी मिळते. अशावेळी तो एक टोक सांभाळून खेळू शकतो आणि आम्ही त्याला दुसऱ्या टोकावर साथ देऊ शकतो.’खरेतर कोहलीला नव्या स्थानावर ताळमेळ साधण्यास पुरेसा वेळ हवा. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या लवकर बाद होण्यामुळे समस्या बिकट होत आहे. डावखुरा धवन २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार जिंकल्यापासून संघात आहे. यादरम्यान विदेशात त्याने केवळ दोन वन-डे शतके ठोकली. गोलंदाजी ही तर संघाची फार मोठी डोकेदुखी. कमकुवत माऱ्यामुळे तिरंगी मालिकेत सपाटून मार खावा लागला आणि आता स्पर्धेबाहर होण्याची वेळ आली. आॅस्ट्रेलिया- इंग्लंड हे शुक्रवारी होबार्ट येथे एकमेकाविरुद्ध खेळतील. या सामन्यातील विजयी संघ १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.(वृत्तसंस्था)कोहली मेलबोर्न आणि ब्रिस्बेनच्या दोन्ही सामन्यात गरज नसताना फटका मारून बाद झाला. त्याने क्रमश: नऊ आणि चार धावा केल्या आहेत. अशावेळी त्याला तिसऱ्या स्थानावर पाठविले जाते की मग चौथ्या स्थानावर कायम ठेवले जाते हे पाहणे रंजक ठरेल. कोहलीने तिसऱ्या स्थानावर खेळून २१ पैकी १४ वन डे शतके झळकविली आहेत.
होबार्ट सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजी सुधारेल?
By admin | Published: January 22, 2015 12:17 AM