ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानिरो, दि. 10 - हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या लाजिरवाण्या पराभवामुळे महिला हॉकी संघाचे रिओ ऑलिम्पिकमधील आव्हान जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत. या सामन्यात भारतीय महिला खेळाडू चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. काही भारतीय महिला खेळाडूंना साधा चेंडूवर ताबाही राखता आला नाही. तर सामन्याच्या पाचव्या मिनिटांपासून ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा सपाटा लावला असतानाच सामन्याच्या शेवटच्या 10 सेकंदांमध्ये टी. अनुराधाने भारताकडून पहिला गोल केला. या शेवटच्या काही सेकंदांचा अपवाद वगळता भारताच्या हाती या सामन्यातून काहीही लागले नसल्यानं भारतीय हॉकीप्रेमीची पार निराशा झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 5, 9, 35, 36, 43, 46 अशा मिनिटांना गोल करत भारताला बचावाची संधीसुद्धा दिली नाही.