शिलाँग : गेल्या दोन सत्रांत सुवर्णपदकांपासून वंचित राहिलेला भारतीय पुरुष हॉकी संघ १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत आज, रविवारी बांगलादेशविरुद्ध आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. भारताने मनदीप अंतिलच्या नेतृत्वाखाली आपला दुय्यम दर्जाचा संघ या स्पर्धेसाठी उतरविला आहे. भारताचे वरिष्ठ बहुतांश खेळाडू हॉकी इंडिया लीगमध्ये व्यस्त आहेत. वर्ल्ड रँकिंगमध्ये त्यांच्यापेक्षा २२ स्थानांनी मागे असलेल्या बांगलादेशविरुद्ध भारताला कसली अडचण येईल असे वाटत नाही. भारताची खरी परीक्षा उद्या, सोमवारी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. नऊ महिन्यांच्या निलंबनानंतर पुनरागमन करीत असलेला मिडफिल्डर गुरबाज सिंग याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्याबाबत तो म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखणार नाही. आमच्या धोरणांवर कितपत अंमलबजावणी होते ते उद्याच्या सामन्यात दिसून येईल. पाकिस्तानवर विजय मिळविणे हे या स्पर्धेत महत्त्वपूर्ण असले, तरी आमचा सध्याचा सर्व फोकस उद्याच्या सामन्यावर केंद्रित आहे.’
हॉकी : यजमानांचे अभियान आजपासून
By admin | Published: February 07, 2016 3:15 AM