नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारसिंग याच्यावर असलेल्या विनयभंगाच्या आरोपप्रकरणी हॉकी इंडियाने दिल्ली महिला आयोगाच्या नोटिशीचे उत्तर देण्यासाठी दहा आठवड्यांची मुदत मागितली. हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालक आर. के. श्रीवास्तव यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना बुधवारी लिहिलेल्या पत्रात भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचा उल्लेख केला. या प्रकरणी राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश महिलेने सरदारसिंगविरुद्ध लग्नाचे आमीष देत विनयभंग केल्याची तक्रार नोंदविली. यावर मालिवाल यांनी जानेवारी २०१६ मधील विनयभंग तसेच हल्लाप्रकरणी सरदारसिंग याच्याविरुद्ध कुठलाही एफआयआर का नोंदविण्यात आला नाही, अशी विचारणा केली होती. एफआयआर नोंदविण्यात चालढकल करणाऱ्या पंजाब पोलिसांवर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते. सरदारने मात्र या आरोपाचा इन्कार केला. सध्या भारतीय संघ आॅलिम्पिक तयारीत व्यस्त असून, त्यापूर्वी विविध स्पर्धा खेळत आहे. आॅलिम्पिकनंतरच आपल्या नोटिशीचे उत्तर देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या पत्रात श्रीवास्तव पुढे म्हणतात, ‘कथित विनयभंगाचे प्रकरण मागच्या वर्षीचे आहे. तक्रारकर्त्या महिलेने मे २०१६ मध्ये तक्रार केली. त्यामुळे नोटीस पाठविण्याआधी सर्व तथ्यांचा विचार व्हायला हवा. सरदार आॅलिम्पिक खेळू नये या हेतूने सदर महिला प्रकरण पुढे करीत वचपा काढू इच्छिते, अशा आशयाचे वृत्त मीडियात आले आहे. तक्रारकर्त्याचे प्रकरण दिल्ली महिला आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरचे असल्याने त्या महिलेला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला द्यावा. पोलीस काय तो तपास करतील. (वृत्तसंस्था)
हॉकी इंडियाने मागितली दहा आठवड्यांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 1:53 AM