भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद, १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे का?युवक कल्याण व क्रीडा खात्याचे केंद्रीय मंत्र्यानी केंद्रानं अजून कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ असे जाहीर केलेले नाही. धुळ्यातील एका शिक्षकानं दाखल केलेल्या RTIवर मंत्रालयाकडून हे उत्तर मिळाले आहे. मयुरेश अग्रवाल यांनी दाखल केलेल्या RTIमध्ये हॉकीला केव्हा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळेल, असे विचारले गेले होते. त्यावर सरकारने कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर केलेले नाही. सरकारला सर्व खेळांचा प्रसार करायचा आहे, असे उत्तर मिळाले.
ओडिशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात?२०१३पासून ओडिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. व्हायरल झालेल्या पत्रात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.