ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. २९ : आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या स्पेन संघाकडून दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय सिनियर्स हॉकी संघाला ३-२ ने पराभव पत्करावा लागताच रिओ आॅलिम्पिकच्या तयारीला धक्का बसला आहे. विश्व क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने ही मालिका ०-२ ने गमविली. ११ व्या स्थानावर असलेल्या स्पेनने पहिला सामना ४-१ ने जिंकला होता.
आठ वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन भारतीय हॉकी संघाला येथून थेट रिओला जायचे आहे. भारताने अखेरचे सुवर्ण १९८० च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते. भारताकडून दुसऱ्या सामन्यात मनप्रितने ३८ व्या आणि रमणदीपने ५८ व्यामिनिटाला गोल केला. स्पेनकडून जोसेफ रोमेयू २० व्या, पाऊ किमाडा ४२ व्याआणि सॅल्व्हाडोर पियरा याने ५३ व्या मिनिटाला गोल नोंदविला.
रोमेयूने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती पण मनप्रितच्या गोलमुळे भारताने बरोबरी साधली. चार मिनिटानंतर स्पेनसाठी किमाडा याने गोल नोंदवित पुन्हा आघाडी मिळवून दिली. स्पेनकडून पियरा याने ५३ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. चार मिनिटानंतर रमणदीप याने गोल केला. पण तोवर सामना हातून निघून गेला होता. या गोलमुळे केवळ पराभवाचे अंतर कमी झाले.अजय यादव आणि वरुण कुमार यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने इंग्लंडला ७-१ ने सहज पराभूत केले. अजयने २७ आणि ४३ तसेच वरुणने ३२ आणि ३५ व्या मिनिटांना प्रत्येकी दोन गोल केले. मनप्रितने १५व्या, गुरजतसिंगने ३८ आणि सिमरनजीतसिंग याने ४० व्या मिनिटाला प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले.
इंग्लंडचा एकमेव गोल एड होल्डरने केला.भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत सातत्याने चेंडूवर नियंत्रण राखले. याचा लाभ मनप्रितला मिळाला. इंग्लंडला लगेचच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर होल्डरने गोल नोंदवित इंग्लंडला बरोबरी साधून दिली. यानंतर इंग्लंड संघ दडपणाखाली खेळला. भारतासाठी गुरजंतच्या क्रॉसवर अजयने दुसरा गोल केला. वरुणने यानंतर आणखी दोन गोल करताच मध्यांतरापर्यंत भारताची आघाडी ४-१ अशी झाली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी तीन गोल करीत मोठ्या फरकाने विजय साजरा केला.