Hockey World Cup: भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर रविवारी (22 जानेवारी) झालेल्या क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय संघाला शूटआऊटमध्ये न्यूझीलंडकडून 5-4 असा पराभव पत्कारावा लागला. निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते, त्यामुळे सामना शूटआऊटमध्ये गेला.
ललित उपाध्याय, सुखजित सिंग, वरुण कुमार यांनी निर्धारित वेळेत भारताकडून गोल केले. दुसरीकडे, किवी संघाकडून सॅम लेन, केन रसेल आणि शॉन फिंडले यांनी गोल केले. भारतीय संघ साखळी टप्प्यात गट-डीमध्ये दुसऱ्या स्थानावर होता, त्यामुळे क्रॉसओव्हर सामना खेळावा लागला. भारताचे तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक बरोबरीत 7 गुण होते. इंग्लंडचेही तेवढेच गुण होते, त्यांनी भारताला चांगल्या गोल सरासरीच्या आधारे मागे टाकून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडचा सामना जगज्जेत्या बेल्जियमशी होणार आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. खेळाच्या 12व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो व्यर्थ गेला. दुसरा क्वार्टरमध्ये एकूण तीन गोल झाले. सर्वप्रथम ललित उपाध्यायने (17व्या मिनिटाला) अप्रतिम मैदानी गोल करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर भारताला चार मिनिटांत तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यात एक गोल झाला. म्हणजेच टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. भारतासाठी पेनल्टी कॉर्नरवर सुखजित सिंगने (24व्या मिनिटाला) हा गोल केला. खेळाच्या 28व्या मिनिटाला सॅम लेनचा फटका भारतीय गोलरक्षकाला रोखता न आल्याने न्यूझीलंडला एक गोल मिळाला.
यानंतरही भारतीय संघाची सामन्यावर पकड मजबूत होती, पण या क्वार्टरमध्ये वरुण कुमारला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले. यासह स्कोअर 3-1 असा भारताच्या बाजूने झाला. त्यानंतर 43व्या मिनिटाला भारतीय बचावफळीने चूक केल्यामुळे न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पेनल्टी कॉर्नरवरून गोल करण्यात केन रसेलला यश आले. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावफळी बिथरलेली दिसली, त्याचा फायदा घेत दोन गोल करत समान शूटआऊटमध्ये आणला. अखेर शुटआऊटमध्ये कीवी संघाने भारताचा पराभव केला.