ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्री ८ वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सचा सामना रंगणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सचे पारडे या सामन्यात जड वाटत आहे. युवा खेळाडू नितिश राणा, किरोन पोलार्ड, जोश बटलर, पार्थिव पटेल, रोहित शर्मा या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान दिल्लीसमोर असेल. मुंबईच्या तुलनेत दिल्लीची फलंदाजी काहीशी कमकुवत आहे. दिल्लीची सुरूवात करणारा संजू सॅमसन आणि रिषभ पंत फॉर्ममध्ये आहे.
मात्र त्यांना श्रेयस अय्यर इतर फलंदाजांची साथ लाभत नाही. मुंबईचा संघ समतोल आहे. दमदार फलंदाजीसोबतच उत्तम गोलंदाजांचा ताळमेळ मुंबई संघात आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघांवर वर्चस्व गाजवत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.
मुंबईची गोलंदाजी काहीशी चिंतेची बाब आहे. जसप्रीत बुमराह, लसीथ मलिंग, मिशेल मॅक्लेघन यांची गेल्या सामन्यात आमला आणि मॅक्सवेल यांनी चांगलीच धुलाई केली होती. तर हरभजन सिंहलाही फारसे यश मिळाले नव्हते. गोलंदाजीचा विचार करता दिल्लीची गोलंदाजी जहीर खानमुळे जरा मजबूत आहे. मात्र दिल्लीकडे मॅचविनर खेळाडूंची वानवा आहे.
मॅथ्युज् , बिलिंग्ज हे सातत्याने अपयशी ठरलेत. मुंबईकडे पंड्या बंधुंच्या रुपाने मॅचविनर खेळाडू आहेत. कृणाल आणि हार्दिक हे फटकेबाजी करून संघाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकतात. तर दोघांनी गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. कृणालने केकेआर विरोधात ३ गडी बाद केले होते. तर सनरायजर्स आणि आरसीबी विरोधात दमदार ३७ धावांची खेळी केली होती. हार्दिकने तर आयपीएलच्या या सत्रात मुंबईकडून दमदार फटकेबाजी केली आहे.