कोल्हापूर : राज्यातील सात हिंद केसरींसह ३0 हून अधिक महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ मल्लांचे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून रखडले आहे. मिळणारे मानधन किमान एक ते सात तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा या मल्लांकडून व्यक्त होत आहे; मात्र त्यांच्या मागणीला क्रीडा खाते दाद देत नाही.
एकेकाळी कुस्ती म्हटले की, कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर या शहरांचा दबदबा राज्यात होता. त्यात हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल म्हटले की त्यांचा सन्मान केला जात होता. वेळच्या वेळी ज्येष्ठ झालेल्या मल्लांना मानधन दिले जात होते; मात्र कालांतराने सरकार बदलत गेले, तसे त्यांचे दिवसही पालटत गेले. महिन्याकाठी थेट बँक खात्यावर जमा होणारे मानधन कधी चार महिने, तर कधी वर्षभर जमा होईनासे झाले. हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते; मात्र हे मानधन गेल्या १0 महिन्यांपासून मल्लांना न मिळाल्याने यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना उतारवयात योग्य आहार न मिळाल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात औषधोपचारांचा खर्च न परवडणारा आहे. मानधनधारक मल्ल अशा या तुटपुंज्या का असेना मानधनावरच अवलंबून आहेत.
अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत; त्यामुळे क्रीडाप्रेमी असलेल्या राज्याचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून या मंडळींचे मानधन वाढवून वेळच्या वेळी द्यावे, अशी मागणी या मल्लांकडून केली जात आहे.मानधन का रखडले?मानधनाचा निधी जिल्हा क्रीडा कार्यालयात गेल्या आठवडाभरापूर्वी आला आहे; मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडियासाठी गेलेले आहेत; त्यामुळे हे मानधन बीडीएस प्रणालीद्वारे ते यापूर्वीच करून जाणे गरजेचे होते; मात्र ते आता विचारणा केल्यानंतर शुक्रवार (दि. १७) पर्यंत मल्लांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे सांगत आहेत. अशा बाबी वारंवार कुस्तीगीरांच्या मानधनाबाबत होत आहेत.जेवढे मानधन आम्हाला महिन्याकाठी देता, ते तरी वेळेत द्यावे. यापूर्वी आम्ही मानधन वाढवून देण्याची क्रीडा खात्याकडे मागणी केली होती. त्याची दखल न घेता त्या अर्जांना केराची टोपली दाखविली आहे. तेव्हा आता उद्धवजींच्या सरकारने तरी आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा. - हिंद केसरी दीनानाथसिंह