पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. वेगवेगळ्या देशाचे खेळाडू या स्पर्धेतून अशक्यप्राय वाटणारी गोष्ट मेहनत अन् जिद्दी बाळगल्यासक क्य करुन दाखवता येते, याची प्रेरणा या मंचावरून खेळाडू जगाला देतील.
भारताचा मोठा ताफा; १२ वेगवेगळ्या खेळात ८४ खेळाडू उतरणार मैदानात
भारतीय खेळाडूंकडून या स्पर्धेत मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. टोकियो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण १९ पदकांची कमाई केली होती. यावेळी हा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. कारण यावेळी भारताने यास्पर्धेसाठी सर्वात मोठं पथक पाठवलं आहे. १२ वेगवेगळ्या खेळ प्रकारात तब्बल ८४ भारतीय खेळाडू सहभाग घेणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यात हे दोन खेळाडू करतील भारतीय ताफ्याचे नेतृत्व
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार, खेळाडू आपापल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन मिरवताना दिसतील. भारताकडून टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचा गोल्डन सुमित अंतिलसह महाराष्ट्रातील नांदेडची लेक आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हिला भारताच्या ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. पॅरिसमधील पॅरालिम्पक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हे दोन खेळाडू भारतीय पथकाचे नेतृत्व करताना दिसतील.
कोण आहे सुमित अंतिल?
सुमित अंतिल हा भारतीय पॅरालिम्पियन स्टार आहे. जो भालाफेक क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करतो. गत पॅरालिम्पिक स्पर्धेसह सुमितनं जागतिक स्तरावरील पॅरा अॅथलिटिक्स स्पर्धेत F64 क्रीडा प्रकारात भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली होती. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतूनही त्याच्याकडून अशाच प्रकारच्या सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राची लेक भाग्यश्री जाधवकडूनही यावेळी पदकाची आस
महाराष्ट्रातील नांदेडची लेक भाग्यश्री जाधव हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. भारतासाठी अनेक पदकं जिंकणारी भाग्यश्रीनं टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गोळा फेक प्रकारात ती सातव्या क्रमांकावर राहिली होती. ही कसर भरून काढत यावेळी ती पदकाला गवसणी घालून भारताच्या पदकांचा आकडा उंचावणारी कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.