मुंबई : डोपिंग आरोपाबाबत सीबीआय चौकशी सुरु असून याबाबत येणा-या निकालाची मला प्रतीक्षा आहे. या चौकशीमुळे माझ्यावर लागलेले डाग नक्की पुसले जातील, असा विश्वास भारताचा मल्ल नरसिंग यादव याने व्यक्त केला.मुंबईत शुक्रवारी स्टार व्यावसायिक मल्ल संग्राम सिंग याने १५ सप्टेंबरला दिल्लीत होणाºया पहिल्या के. डी. जाधव स्मृती आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची घोषणा केली. यावेळी, नरसिंगसह खाशबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांचीही उपस्थिती होती. नरसिंगने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘डोपिंग आरोपाबाबत सीबीआय चौकशी सुरु असून मी निकालाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा आहे.’‘रिओ ओलिम्पिकमध्ये मी पदक विजयाच्या खूप जवळ होतो व पदक विजेत्यांना मी याआधी नमवले होते. आशा करतो की मला न्याय मिळेल. अद्याप सीबीआय चौकशीची तारिख मिळाली नसून मी कुस्ती महासंघाच्या संपर्कात नाही,’ असेही तो म्हणाला.सध्या खेळापासून दूर असलेल्या नरसिंगने आपल्या सरावामध्ये मात्र कोणतीही कसर ठेवलेली नाही. त्याने म्हटले की, ‘माझा कसून सराव सुरु असून आगामी आॅलिम्पिकमध्ये मी चांगली कामगिरी करु इच्छितो. टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत ३ ते ४ पदक नक्की मिळतील.’रिओ आॅलिम्पिकसाठी भारताकडून नरिसंगला ७४ किलो वजनी गटातून प्रवेश मिळाला होता. विशेष म्हणजे दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार ऐवजी नरसिंगला भारताकडून पाठविण्यात आले होते. परंतु, नरसिंगला त्याच्या लढतीच्या एक दिवसाआधी क्रीडा लवादाने खेळण्यास बंदी केली होती. नरसिंगने २०१५ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत्ज कांस्य पटकावले होते. तो सध्या कसून सराव करीत असून आगामी २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभाग होऊन चांगल्या कामगिरीची त्याला आशा आहे.
डोपिंग आरोपातून निर्दोष मुक्तता होण्याची आशा - नरसिंग यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:34 AM