नवी दिल्ली : आशिया कप व विश्वकप स्पर्धेत फॉर्म कायम राखण्यात यश येईल, अशी आशा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केली. बेसिक्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे यश मिळाल्याचे धवन म्हणाला. धवन रविवारी रात्री श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर, आपला सलामीचा सहकारी रोहित शर्मासोबत चर्चा करीत होता. या दोघांदरम्यानच्या चर्चेचा व्हिडीओ बीसीसीआय टीव्हीवर पोस्ट करण्यात आला. धवन मुलाखत घेणाऱ्या रोहितला म्हणाला,‘माझा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा असल्याने, माझा सहकारी सांगत असल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. बेसिक्सवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मी टायमिंगवर लक्ष देत आहे. टी-२० मध्ये मोठे फटके खेळावे लागतात. किमान चेंडू खेळले, तर दडपण झुगारण्यास मदत मिळते.’धवनने दुसऱ्या लढतीत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर तिसऱ्या लढतीत नाबाद ४६ धावांची खेळी करीत, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. धवन म्हणाला,‘सध्या जशी कामगिरी करीत आहे, त्यात सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. माझ्यासाठी ही पद्धत अनुकूल असून, संघासाठीही लाभदायक आहे. आम्ही दोघे खेळपट्टीवर असताना भारतीय चाहत्यांसाठी विशेष कामगिरी करू शकतो.’ (वृत्तसंस्था)
‘विश्वचषक स्पर्धेत चमकण्याची आशा’
By admin | Published: February 16, 2016 3:30 AM