कोलंबो : कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा कुमार संगकारा भारताच्या अचूक माऱ्यापुढे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला; पण यजमान श्रीलंका संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद १४० धावांची मजल मारून सावध सुरुवात केली. श्रीलंकेने संथ फलंदाजी करताना आतापर्यंत केवळ प्रतिषटक २.९०च्या सरासरीने धावा केल्या. श्रीलंकेला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २५३ धावांची गरज आहे.सलामीवीर कौशल सिल्वाने (५१) अर्धशतकी खेळी केली; पण सर्वांची नजर संगकाराच्या कामगिरीवर होती. संगकारा केवळ ३२ धावा फटकावून तंबूत परतला. आजचा खेळ थांबला त्या वेळी २८ धावा काढून खेळपट्टीवर असलेला लाहिरू थिरिमाने याला कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (१९) साथ देत होता. त्यापूर्वी भारताने पहिल्या डावात ३९३ धावांची मजल मारली. काल नाबाद असलेल्या रिद्धिमान साहाने (५६) अर्धशतक झळकावले. श्रीलंकेतर्फे डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने ८१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.श्रीलंकेच्या डावात भारताचे दोन फिरकीपटू रविचंद्रन आश्विन व अमित मिश्रा यांनी अनुक्रमे ३७ व ९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी १ बळी घेतला. वेगवान गोलंदाज उमेश यादवने ३४ धावांत एक बळी घेऊन संघाला सुरुवातीला यश मिळवून दिले.संगकारा सुरुवातीपासून आश्विनविरुद्ध चाचपडत खेळत असल्याचे दिसत होते. आश्विनने संगकाराविरुद्धचे वर्चस्व कायम राखले. चहापानानंतर आश्विनच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात संगकाराचा उडालेला झेल स्लीपमध्ये तैनात अजिंक्य रहाणेने टिपला. मालिकेत आश्विनने संगकाराला तिसऱ्यांदा तंबूचा मार्ग दाखविला. त्याआधी संगकारा वैयक्तिक २४ धावांवर असताना आश्विनच्या गोलंदाजीवर रहाणेला त्याचा अवघड झेल टिपता आला नाही. संगकाराने सिल्वाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या षटकात आपल्या पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला (१) पायचित केले; पण रिप्लेमध्ये चेंडू डाव्या यष्टीबाहेर जात असल्याचे दिसत होते. संगकारा मैदानात दाखल झाला तेव्हा भारतीय संघ व मैदानावरील दोन्ही पंचांनी या महान फलंदाजाला ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला.त्यानंतर संगकारा बाद होऊन तंबूत परतत असताना भारतीय खेळाडूंनी त्याच्याप्रति आदर व्यक्त करताना टाळ्या वाजविल्या, तर स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येकाने या महान खेळाडूला उभे राहून अभिवादन केले. त्यात संगकाराचा सहकारी माहेला जयवर्धने याचाही समावेश होता. जयवर्धने संगकाराची खेळी बघण्यासाठी स्टेडियममध्ये प्रामुख्याने उपस्थित होता. सिल्वालाही नशिबाची साथ लाभली. तो वैयक्तिक १४ धावांवर असताना स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला; पण हा नोबॉल असल्यामुळे सिल्वा सुदैवी ठरला. संगकारा बाद झाल्यानंतर श्रीलंका संघाने संथ फलंदाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर दडपण निर्माण झाले. लाहिरू थिरिमानेला जम बसविण्यासाठी वेळ लागला, तर सिल्वाला लेग स्पिनर मिश्राविरुद्ध खेळताना अडचण भासत होती. सलामीवीर सिल्वाने ९२ चेंडूंमध्ये नववे कसोटी अर्धशतक पूर्ण केले; पण अखेर मिश्राने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. सिल्वाने वळणाऱ्या चेंडूवर मारलेला स्विपचा फटका फसला आणि शॉर्ट फाईन लेगला तैनात आश्विनच्या हातात विसावला. सिल्वाने ११८ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार ठोकले. थिरिमानेने सावध पवित्रा स्वीकारला, तर मॅथ्यूज यादवच्या अचूक गोलंदाजीपुढे चाचपडत असल्याचे दिसले. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याआधी, भारतातर्फे साहा व मिश्रा (२४) यांनी आठव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. मिश्राला चामिराने तंबूचा मार्ग दाखविला. साहाने १०६ चेंडूंना सामोरे जाताना कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. धावफलकभारत पहिला डाव :- मुरली विजय पायचित गो. प्रसाद ०, के.एल. राहुल झे. चांदीमल हो. चामीरा १०८, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. प्रसाद ४, विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेराथ ७८, रोहित शर्मा पायचित गो. मॅथ्यूज ७९, स्टुअर्ट बिन्नी झे. चामिरा गो. हेराथ १०, रिद्धिमान साहा पायचित गो. हेराथ ५६, आर. आश्विन झे. सिल्वा गो. मॅथ्यूज २, अमित मिश्रा झे. चांदीमल गो. चामिरा २४, ईशांत शर्मा पायचित गो. हेराथ २, उमेश यादव नाबाद २. अवांतर : २८. एकूण : ११४ षटकांत सर्व बाद ३९३. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१७६, ४-२३१, ५-२६७, ६-३१९, ७-३२१, ८-३६७, ९-३८६. गोलंदाजी : प्रसाद २४-७-८४-२, मॅथ्यूज १५-७-२४-२, चामिरा २०-२-७२-२, हेराथ २५-३-८१-४, कौशल ३०-२-१११-०.श्रीलंका पहिला डाव :- दिमुथ करुणारत्ने पायचित गो.यादव १, कौशल सिल्वा झे. आश्विन गो. मिश्रा ५१, कुमार संगकारा झे. रहाणे गो. आश्विन ३२, लाहिरू थिरिमाने खेळत आहे २८, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे १९. अवांतर : ९. एकूण : ५३ षटकांत ३ बाद १४०. बाद क्रम : १-१, २-७५, ३-११४. गोलंदाजी : ईशांत १०-२-३१-०, यादव ११-५-३४-१, बिन्नी ११-३-२४-०, आश्विन १४-२-३७-१, मिश्रा ७-१-९-१.(वृत्तसंस्था)
यजमान संघाचा सावध पवित्रा
By admin | Published: August 21, 2015 10:54 PM