कॅलिफोर्निया : यजमान अमेरिकेने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पॅराग्वेला १-० असे नमवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकाविताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, तर दुसरीकडे चुरशीच्या सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचाविताना कोस्टा रिकाने कोलंबियाला ३-२ असे नमविले. कोलंबियाने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.अमेरिकेने सामन्यात सावध पवित्रा घेताना पॅराग्वेच्या चालींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, २७व्या मिनिटाला ग्यासी जार्डेसने केलेल्या गोलच्या जोरावर अमेरिकेने१-० अशी आघाडी घेतली. हीच आघाडी शेवटपर्यंत राखून अमेरिकेने सामन्यावर वर्चस्व राखले.त्याचवेळी ‘अ’ गटात कोस्टा रिकाने शानदार खेळ करताना बाद फेरी गाठलेल्या कोलंबियाला पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्याच मिनिटाला जोहान वेनेगास याने वेगवान गोल करताना कोस्टा रिकाला आघाडीवर नेले. मात्र, लगेच सातव्या मिनिटाला फ्रँक फाबरा याने गोल करून कोलंबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर फाबराची एक चूक कोलंबियाला महागात पडली.३४व्या मिनिटाला कोलंबियाच्या गोलक्षेत्रात झालेल्या आक्रमक हालचालींमुळे दडपणाखाली आलेल्या फाबराकडून स्वयंगोल झाला आणि कोस्टा रिका २-१ असे आघाडीवर आले. ५८व्या मिनिटाला सेल्सो बोर्जिस याने केलेल्या गोलच्या जोरावर कोस्टा रिकाने ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली. अखेरची १७ मिनिटे शिल्लक असताना मार्लोस मोरेनो याने ७३व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल करताना कोलंबियाची पिछाडी २-३ अशी कमी केली. अखेर कोस्टा रिकाने ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. (वृत्तसंस्था)>यजमान अमेरिकेचा पुढील सामना ‘ब’ गटातील द्वितीय स्थानी असलेल्या संघाविरुद्ध होईल. ‘अ’ गटात अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेनंतर द्वितीय स्थानी कोलंबिया आहे, तर कोस्टा रिका व पॅराग्वे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिल्याने एलिमिनेट झाले आहेत. तसेच ‘ब’ गटात ब्राझील व पेरू अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थानी असून, इक्वेडोर (तृतीय) व हैती (चौथे) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
यजमान अमेरिकेची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By admin | Published: June 13, 2016 6:15 AM