मुंबई : गतविजेत्या गुजरात संघाने लौकिकास साजेसा खेळ करत यजमान महाराष्ट्राचा ७९ धावांनी पराभव करुन राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.द ब्लार्इंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या (बीडब्ल्यूओ) वतीने झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना मरिन लाईन्स येथील विल्सन जिमखाना मैदानावर झाला. गुजरातने तुफान टोलेबाजी करताना प्रथम फलंदाजी करत महाराष्ट्रापुढे २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. महाराष्ट्राने दमदार फटकेबाजी करत उत्कृष्ट आक्रमक सुरुवात केली. अनिल बेलसरे, पी. अक्षय जोडीने प्रतिस्पर्धी गोलदाजी फोडून काढताना अवघ्या ३ षटकांत ३६ धावांची सलामी दिली. अनिल २२ धावांवर बाद झाल्यानंतर महाराष्ट्राची घसरगुंडी उडाली. आक्रमणाच्या नादात संदिप (११ धावा), निलेश (११), राहूल (१८) झटपट बाद झाले. अक्षयने एकाकी झुंज देत ३८ धावा केल्या. महाराष्ट्राने १० षटकांत १०० धावांचा पल्ला पार केला, मात्र दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने बळी गेले. महाराष्ट्राला १५ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावापर्यंतच मजल मारता आली. तत्पुर्वी, गुजरातची सलामी जोडी नरेश थुमडा (१२०) आणि झिना केसरे (४८) यांनी शतकी सलामी देत गुजरातच्या विजयाचा पाया रचला. (क्रीडा प्रतिनिधी)
यजमान महाराष्ट्राचे उपविजेतेपदावर समाधान
By admin | Published: January 14, 2017 4:20 AM