Nora Fatehi | कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या FIFA World Cup 2022 चा अंतिम सामना आज रात्री खेळवला जाणार आहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना भिडणार आहेत. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक असेल यात दुमत नाही. कारण या सामन्यात कायलिन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसणार आहेत. यात विशेष म्हणजे अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभही (Closing Ceremony) होणार आहे. दिमाखदार स्पर्धेसोबतच या समारोप सोहळ्याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. भारतीय अभिनेत्री आणि स्टार डान्सर नोरा फतेही समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे. चला जाणून घेऊया FIFA विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभात कधी, कुठे आणि कोण परफॉर्म करणार आहे?
समारोप समारंभ कधी आणि किती वाजता सुरू होईल?
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे. हा समारोप सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. समारोपाचा सोहळा अर्धा तास रंगण्याची शक्यता आहे. १८ डिसेंबर हा कतारचा राष्ट्रीय दिवस देखील आहे, अशा परिस्थितीत चांगले परफॉमन्स होतील असा कतारवासीयांना विश्वास आहे.
कुठे होणार समारोप समारंभ?
समारोप समारंभ आणि अंतिम सामना दोन्ही लुसेल स्टेडियमवर होणार आहेत. लुसेल स्टेडियम हे कतारमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे आणि त्याची क्षमता सुमारे ८९ हजार प्रेक्षकांची आहे.
समारोप समारंभ कुठे पाहू शकाल?
फिफा विश्वचषकाचा समारोप समारंभ भारतात Sports 18 आणि Sports 18 HD वर प्रसारित केला जाईल. JioCinema App आणि वेबसाइटवरही समारोप समारंभाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
समारोप समारंभात कोण-कोण?
फिफाने अद्याप समारोप समारंभासाठी कलाकारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. भारतीय अभिनेत्री नोरा फतेही या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच, नायजेरियन-अमेरिकन संगीतकार डेव्हिडो देखील कार्यक्रमात वर्ल्ड कप 2022 थीम सॉन्ग (हया-हया) सादर करणार आहे. पोर्तो रिकन सिगार ओझुना आणि काँगोलीज-फ्रेंच रॅपर गिम्स यांनीही समारोप समारंभास उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेझ आणि शकीरा वर्ल्ड कप फायनलसाठी एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहेत.