पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीत बरोबर शंभर वर्षांनंतर ऑलिम्पिक होत आहे. ४५,००० स्वयंसेवकांसाठी हा संस्मरणीय अनुभव ठरावा. यापैकी काहींना विमानतळावरच टेनिस स्टार कार्लोस अल्काराजचे दर्शन घडले. ६० वर्षांचा एक स्वयंसेवक म्हणाला, ‘माझ्या हयातीत पुन्हा पॅरिसमध्ये ऑलिम्पिक होणे नाही.
आयोजन अविस्मरणीय असेच असेल. २० मिनिटांआधी अल्काराज येथे दाखल झाला. मी त्याला ॲक्रिडेशन (ओळखपत्र) मिळवून दिले. हा अनुभव आजीवन सुखद असेल.’ पॅरिसमधील स्थानिकांना ऑलिम्पिक कटू अनुभव देणारे ठरत आहे. आयोजनाचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम झाला. अंतर्गत प्रवास २.१५ युरोपर्यंत पोहोचला. पॅरालिम्पिक संपेपर्यंत अर्थात दि. ८ सप्टेंबरपर्यंत हे भाडे कायम असेल.
ऑलिम्पिक आयोजनाच्या जवळपास जाण्यास बंदी आहे. शहरातील सर्वांत गर्दीच्या स्टेशनवरील प्रवासी व्हिक्टोरी डेलारू म्हणाली, ‘पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ही गर्वाची बाब असली तरी स्थानिकांच्या दैनंदिन जगण्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रवास भाडे का महागले याचे उत्तर कोणाकडेही नाही.’
ऑलिम्पिक आयोजनाच्या आधी हॉटेल हाउसफुल्ल असल्याचे भासविण्यात आले. यामुळे स्थानिकांनी आपली घरे भाड्याने उपलब्ध करून दिली. येथे आल्यानंतर हॉटेल्सची तितकी मागणी नसल्याचे स्पष्ट झाले. पॅरिसमध्ये पर्यटनाचा हा चांगला हंगाम असला तरी हॉटेल्स रिकामी आहेत. एका हॉटेलचा व्यवस्थापक समीर म्हणाला, ‘हॉटेलचे एका रात्रीचे भाडे १२० युरो आहे, पण आम्ही अर्ध्या किमतीवर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. अनेक निर्बंध आहेत. काही ठिकाणी जाण्यास क्यूआर कोड लागतो.
सीन नदी खरोखर स्वच्छ आहे? ऑलिम्पिकसाठी स्थानिक प्रशासनापुढे सर्वांत मोठे आव्हान होते ते सीन नदीची सफाई! या नदीच्या पात्रात उद्घाटन सोहळा, ट्रायथलॉन आणि मॅरेथॉन जलतरण होणार आहे. ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच पाण्यावर उद्घाटन होत असल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सीन नदीत पोहण्यावर शंभर वर्षांआधी बंदी घालण्यात आली होती. आता नदीच्या सफाईवर दीड अब्ज युरो खर्च झाले. नदी सफाई अनेकदा रखडली.