बासेल : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताचा उगवता तारा असलेल्या एचएस प्रणयने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करताना स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जर्मनीच्या मार्क ज्वेबलरचे कडवे आव्हान परतावले. १३व्या मानांकित प्रणयने झुंजार खेळ करताना ४५ मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ज्वेबलरला २१-१८, २१-१५ असे नमवले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ करुन सर्वांचे लक्ष वेधलेल्या प्रणयने ज्वेबलर व्यतिरीक्त आपल्याहून अधिक वरचढ मानांकन असलेल्या इंग्लंडच्या राजीव ओसेफचाही पराभव केला. अंतिम सामन्याची शानदार सुरुवात करताना प्रणयने पहिल्या सेटमध्ये ७-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र यानंतर ज्वेबलरने जबरदस्त पुनरागमन करताना प्रणयला कडवी झुंज दिली. एकवेळ लढत १८-१८ अशी बरोबरी आली होती. मात्र प्रणयने अप्रतिम शॉट्स मारताना सलग तीन गुणांची वसुली करुन १-० अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ३-० अशी आक्रमक सुरुवात केल्यानंतर प्रणयने १३-८ अशी भक्कम आघाडी घेतली. यावेळी ज्वेबलरने पुनरागमनाचे चांगले प्रयत्न केले, मात्र प्रणयने मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना विजेतेपदावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)
एचएस प्रणयचे दिमाखदार विजेतेपद
By admin | Published: March 21, 2016 2:24 AM