World Championships जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू पहिल्याच सामन्यात हरली... लक्ष्य सेनची झुंज उप उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली, चिराग व सात्विक ही फॉर्मात असलेली जोडी काहीतरी कमाल करेल असे वाटले होते, परंतु तेही उपांत्यपूर्व फेरीत हरले अन् भारतीयांनी पदकाच्या आशा सोडल्या. पण, पुरूष एकेरीत एच एस प्रणॉय ( HS Pranoy) भिडला. उपांत्यपूर्व फेरीत त्याने गत वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एस्केलसनचा पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करून प्रणॉयने भारतासाठी एक पदक निश्चित केले. त्याला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील कुनलाव्हूट व्हितिदसर्नचा मुकाबला करावा लागणार आहे.
डेन्मार्कच्या व्हिक्टरला स्थानिक चाहत्यांकडून जबरदस्त पाठिंबा मिळत होता आणि त्याने पहिल्या गेम २१-१३ असा सहज घेतला. पण, दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने कमबॅक केले. त्याने एकेका पॉईंटसाठी व्हिक्टरला झुंजवले अन् दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये व्हिक्टरवरील दडपण अधिक वाढले अन् प्रणॉयने चतुराईने खेळ करून गुणांची आघाडी मिळवली. स्थानिक खेळाडू असल्याने व्हिक्टरच्या पाठीशी संपूर्ण स्टेडियम उभं होतं, प्रणॉयला चिअर करण्यासाठी एखाददुसरा तिरंगा स्टेडियमवर दिसत होता.
प्रणॉयने या गोष्टीचं दडपण अजिबात न घेता व्हिक्टरला चुका करण्यास भाग पाडलं. व्हिक्टरने पिछाडीवरून ९-९ अशी बरोबरी मिळवली, परंतु प्रणॉयने जबरदस्त खेळ करून हा गेम २१-१६ असा जिंकला आणि भारताला पदक पक्कं करून दिलं. प्रकाश पादुकोन ( कांस्य, १९८३), अश्विनी पोनप्पा/ज्वाला गुट्टा ( कांस्य, २०११), पीव्ही सिंधू ( सुवर्ण-२०१९, रौप्य- २०१७, २०१८ व कांस्य- २०१३, २१०४), साईना नेहवाल ( रौप्य - २०१५ व कांस्य - २०१७), साई प्रणित ( कांस्य - २०१९), श्रीकांत किदम्बी ( रौप्य - २०२१), लक्ष्य सेन ( कांस्य - २०२१), सात्विक/चिराग ( कांस्य - २०२२) या भारतीय पदकविजेत्यांमध्ये प्रणॉयचे नाव समाविष्ट झाले आहे.