हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता एन्काऊंटर करण्यात आला आहे. ४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती. चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरिफ आणि चिंताकुटा यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आरोपींनी दंडुके आणि दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपींनी गोळ्या देखील झाडल्या. ही घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ या दरम्यान घडली. या घटनेवर आता भारतातील खेळाडूंनीही आपले मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.
'भारताची फुलराणी' असे बिरुद मिरवणारी आणि हैदराबादमध्येच राहणाऱ्या आणि सराव करणाऱ्या सायना नेहवालनेही या एन्काऊंटरवर आपले मत व्यक्त केले आहे. सायनाने ट्विटरवर लिहिले आहे की, " हैदराबाद पोलीस, तुम्ही महान कार्य केले आहे. तुम्हाला सलाम!"
हैदराबादमध्ये राहणारी भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने या एन्काऊंटरबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पण यावेळी तिने पोलीसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्वाला म्हणाला की, " जे बलात्कार करतील त्यांच्याबरोबर भविष्यामध्येही असेच करण्यात येणार आहे का? या एन्काऊंटरमुळे भविष्यातील बलात्कार रोखले जातील का?" असे प्रश्न ज्वालाने उपस्थित केले आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरनेही याबाबत ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गंभीरने, बलात्कारामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींना लवकर आणि कडक शासन करायला हवे, असे म्हटले आहे.