ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 28 - शिखर धवन, केन विलियम्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचा २६ धावांनी पराभव करताना आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. ४ षटकांत १६ धावा देत १ गडी बाद करणारा लेगस्पिनर राशीद खान सामनावीर ठरला.
सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या २0८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ ९ बाद १८१ धावाच करूशकला. त्यांच्याकडून शॉन मार्शने ५0 चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांसह ८४ धावांची झुंजार खेळी केली. मार्शशिवाय मार्टिन गुप्टिलने २३ आणि इयॉन मॉर्गनने २६ धावा केल्या. हैदराबादकडून सिद्धार्थ कौल आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने २ गडी बाद केले. सनरायजर्सचा सत्रात प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर हा पहिला विजय आहे. तत्पूर्वी, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने ३ बाद २0७ धावा केल्या. धवनने ७७ आणि वॉर्नरने ५१ धावांची खेळी, तसेच सलामीसाठी १0७ धावांची भागीदारीही केली. केन विलियम्सननेही चार चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक २ गडी बाद केले. नाणेफेक गमावून फलंदाजीस उतरलेल्या सनरायजर्स संघाला वॉर्नर आणि धवन यांनी वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६0 धावा ठोकल्या. सुरुवातीला धवनने आक्रमक धोरण अवलंबताना अनुरितला २ चौकार मारल्यानंतर इशांत शर्माचे षटकाराने स्वागत केले. वॉर्नरनही डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला सलग चेंडूवर चौकार आणि दोन षटकार ठोकले; परंतु पुढच्याच चेंडूवर त्याला रिद्धिमान साहाने जीवदान दिले. वॉर्नरने मॅक्सवेलच्या चेंडूवर एक धाव घेत २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि नवव्या षटकात संघाचे शतक फलकावर लगावले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकसनरायजर्स हैदराबाद : २0 षटकांत ३ बाद २0७. (शिखर धवन ७७, केन विलियम्सन ५४, डेव्हिड वॉर्नर ५१, युवराजसिंग १५. मॅक्सवेल २/२९, मोहित शर्मा १/३४). किंग्ज इलेव्हन पंजाब : २0 षटकांत ९ बाद १८१. (शॉन मार्श ८४, मॉर्गन २६, गुप्टिल २३. आशिष नेहरा ३/४२, सिद्धार्थ कौल ३/३६, भुवनेश्वर कुमार २/२७).