नवी दिल्ली : गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर हैदराबाद सनरायझर्सने आयपीएलच्या नवव्या सत्राच्या क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करताना कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान २२ धावांनी संपुष्टात आणले. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी हैदराबादपुढे गुजरात लायन्सचे कडवे आव्हान असेल. हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला केवळ ८ बाद १४० धावा काढता आल्या.फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. कुलदीप यादव, मॉर्नी मॉर्केल व जेसन होल्डर यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादला कोंडीत पकडले होते. मात्र, युवराजसिंग, मोझेस हेन्रिक्स, कर्णधार डेव्हिड वॉर्नर व दीपक हुडा यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने समाधानकारक मजल मारली.१६२ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात अडखळत झाली. रॉबिन उथप्पा झटपट परतल्यानंतर कॉलिन मुन्रो (१६) व कर्णधार गौतम गंभीर (२८) यांनी कोलकात्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुन्रो धावबाद झाल्यानंतर कोलकात्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. मनीष पांड्ये व सूर्यकुमार यादव यांनी कोलकात्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, हेन्रिक्सने सूर्यकुमारला बाद करून ही जोडी फोडली. मनीष पांड्येने २८ चेंडूंत ३६ धावा केल्या. सूर्यकुमार १५ चेंडंूत २३ धावा काढून परतला. भुवनेश्वर कुमार (३/१९) व हेन्रिक्स (२/१७) यांनी टिच्चून मारा केला. याआधी, प्रमुख फलंदाज पहिल्या १० षटकांत परतल्यानंतर युवराज व दीपक हुडा यांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावा उभारल्या. चायनामॅन फिरकीपटू कुलदीपने ३ बळी घेऊन हैदराबादला बॅकफूटवर नेले. मात्र, युवराज (४४), हेन्रिक्स (३१), वॉर्नर (२८) व हुडा (२१) यांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावा उभारल्या. संक्षिप्त धावफलक :सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १६२ धावा (युवराजसिंग ४४, मोझेस हेन्रिक्स ३१, डेव्हिड वॉर्नर २८; कुलदीप यादव ३/३५, मॉर्नी मॉर्केल २/३१, जेसन होल्डर २/३३) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ८ बाद १४० धावा (मनीष पांड्ये ३६, गौतम गंभीर २८, सूर्यकुमार यादव २३; भुवनेश्वर कुमार ३/१९, मोझेस हेन्रिक्स २/१७).
हैदराबाद क्वालिफायरमध्ये
By admin | Published: May 26, 2016 4:10 AM