हैदराबाद : मागच्या सामन्यातील पराभवामुळे सावध झांलेल्या सनरायजर्स हैदराबादने आयपीएल-१० मध्ये आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटस्चा विजयी रथ रोखण्याचा निर्धार केला आहे.पुण्याचे ११ सामन्यांत १४ गुण असून गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. पुण्याने मागील सातपैकी सहा सामने जिंकले हे विशेष. दुसरीकडे सनरायजर्सचे ११ सामन्यांत १३ गुण असल्याने संघ चौथ्या स्थानी आहे. पुणे संघाने मागच्या सामन्यात केकेआरला ईडन गार्डनवर धूळ चारली. त्या सामन्यात युवा सलामीवीर राहुल त्रिपाठीने ५२ चेंडंूत ९३ धावांचा झंझावात केला.सनरायजर्सला मागील सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभवाचा धक्का बसला. पुण्यावर विजय नोंदविणे सनराजयर्सला सोपे जाणार नाही. त्रिपाठी सुरुवातीपासून दमदार फलंदाजी करीत असल्याने हैदराबादविरुद्ध चांगली खेळी करण्यास उत्सुक आहे. बेन स्टोक्सने गुजरात लायन्सविरुद्ध पहिले टी-२० शतक झळकविले होते. पुणे संघाचे गोलंदाजदेखील जबाबदारीचे भान राखत आहेत. केकेआरविरुद्ध जयदेव उनाडकटने मोलाची भूमिका बजावली, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले होते. प्रतिस्पर्धी संघात डेव्हिड वॉर्नर असल्याने या गोलंदाजांना पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी मारा करावा लागेल. (वृत्तसंस्था)सनरायजर्सला घरचे राजीव गांधी स्टेडियम फारच पसंत आहे. याआधी येथे ५९ चेंडूवर १२६ धावा ठोकणारा वॉर्नर म्हणाला,‘प्रत्येक संघ स्थानिक मैदानावर अधिक विजय मिळवू इच्छितो. आम्ही या मैदानाला अभेद्य किल्ला बनवू इच्छितो.’ शिखर धवन, केन विलियम्सन, मोझेस हेन्रिक्स, युवराजसिंग यांच्याकडूनही धावांची अपेक्षा राहील. गोलंदाजीत हैदराबाद संघ सरस आहे. भुवनेश्वर कुमार, राशिद खान, आशिष नेहरा, युवा सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज हे सर्वच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतात. (वृत्तसंस्था)
‘पुण्या’चा विजयरथ रोखण्याचा हैदराबाद सनरायजर्सचा निर्धार
By admin | Published: May 06, 2017 12:52 AM