ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १० : हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर पुणे संघाची फलंदाजी अपयशी ठरली. विजयासाठी मिळालेले १३८ धावांचे माफक लक्ष्यही पुण्याला डोंगराऐवढे मोठे जाणवले. पुणे संघाने निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १३३ धावापर्यंत मजल मारत सामना ४ धावांनी गमवला. या पराभवामुळे पुणे संघाचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. आयपीएल ९ मधील ११ सामन्यात पुणे संघाचा हा ८ वा पराभव आहे.
पुण्याची रणमशीन असलेला रहाणे या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. उस्मान खॉजा ११, जॉर्ज बेली ३४, आर अश्विन २९, सौरभ तिवारी ९ धावांचे योगदान दिले. शेवटी धोनी ३० आणि परेरा १७ यांनी विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले शेवटच्या षटकात १४ धावांती गरज असताना पुणे संघाला ९ धावा काढता आल्या. २ चेंडूत ६ धावांची गरज असताना धोनी मोठा फटका मारायच्या नादात बाद झाला. हैदराबाद संघाच्या गोलंदाजानी निर्णायक क्षणी अचूक मारा करत विजय खेचून आणला. हैदराबादकडून नेहराने ३ फलंदाजांना बाद केले तर भुवनेश्वर, सरन आणि हेनरिक्सने प्रत्येकी एक विकेट मिळवली
त्यापुर्वी, अॅडम झंपाच्या (१९ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकांत ८ बाद १३७ धावांवर रोखले. विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए मैदानावर नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी स्वीकारली. झंपाने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडले. डेव्हिड वॉर्नरला (११) आर. पी. सिंगने, तर शिखर धवनला (३३) आर. आश्विनने तंबूत धाडले. त्यानंतर झंपाने ४ षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात ६ फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखविला.
केन विल्यम्सन (३७ चेंडूंत ३२), युवराज सिंग (२१ चेंडूंत २३) यांनी काहीसा प्रतिकार केला. झंपाने रजत भाटिया व सौरभ तिवारी यांच्याकरवी झेलबाद करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. मोझेस हेन्रिक्स (१०) तंबूत धाडल्यानंतर सामन्याच्या अखेरच्या षटकात दीपक हुडा (१४) नमन ओझा (७), भुवनेश्वर कुमार (१) यांना तंबूत धाडत सनरायझर्सला किरकोळीत गुंडाळले. बरिंदर सरन (१) नाबाद राहिला.